अलिबाग(प्रतिनिधी): जागतिक पर्यावरण दिनानिमित्त रायगड जिल्हा परिषद येथे अध्यक्ष मंगेश वाकडीकर यांच्या हस्ते शुक्रवारी (ता.5) वृक्षारोपण करण्यात आले. त्यांनी पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी प्रत्येकाने किमान एक झाड लावून त्याची निगा राखण्याचे आवाहन केले.
जागतिक पर्यावरण दिन दरवर्षी 5 जून रोजी साजरा केला जातो. 2026च्या जागतिक पर्यावरण दिनानिमित्त निसर्गाचे रक्षण आणि प्रदूषण मुक्तीचा संदेश देण्यात आला.
पर्यावरणाचा ढासळता समतोल राखण्यासाठी शासनातर्फे दरवर्षी मोठ्या प्रमाणात वृक्षलागवड केली जात आहे. त्या अनुषंगाने राजिप अध्यक्ष मंगेश वाकडीकर यांच्या हस्ते कुंटेबाग येथील परिसरात नारळ, बांबू, सुपारीच्या रोपांची लागवड करण्यात आली. या वेळी अध्यक्ष मंगेश वाकडीकर यांनी मार्गदर्शन करताना, गेल्या वर्षी जिल्हा परिषदेच्या माध्यमातून पावसाळ्यात सुमारे अडीच लाख रोपांची लागवड केली होती. यावर्षीदेखील अशाचप्रकारे मोठ्या संख्येने वृक्षलागवड करण्यात येणार आहे. पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी प्रत्येकाने किमान एक झाड लावून त्याची निगा राखण्याचे आवाहन केले.
यावेळी उपमुख्य कार्यकारी अधिकारी ग्रामपंचायत विशाल तनपुरे, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेच्या प्रकल्प संचालक प्रियदर्शनी मोरे, कृषी विकास अधिकारी पवनकुमार नजन, यांच्यासह कृषि विभागाचे अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.






