अलिबाग (प्रतिनिधी): महाराष्ट्र विधान परिषदेच्या ११ रिक्त जागांसाठी होत असलेल्या निवडणुकीत महायुतीने मोठे यश मिळवत आपल्या सहा उमेदवारांची बिनविरोध निवड निश्चित केली आहे. उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या अंतिम दिवशी विरोधी पक्षांच्या काही उमेदवारांनी माघार घेतल्याने महायुतीच्या उमेदवारांचा विजयाचा मार्ग सुकर झाला.
महायुतीकडून राष्ट्रवादी काँग्रेसचे अनिकेत तटकरे आणि विक्रम काळे, शिवसेनेचे रवींद्र फाटक आणि दुष्यंत चतुर्वेदी, भाजपचे अरुण लाडवाणी तसेच प्रणव तणपुरे यांची बिनविरोध निवड निश्चित झाल्याची माहिती समोर आली आहे. या निवडीमुळे विधान परिषदेत महायुतीचे संख्याबळ आणखी मजबूत होणार आहे.
कोकणातील रायगड-रत्नागिरी-सिंधुदुर्ग स्थानिक प्राधिकारी मतदारसंघात महायुतीचे उमेदवार अनिकेत तटकरे यांना मोठा दिलासा मिळाला आहे. विरोधी उमेदवारांनी अर्ज मागे घेतल्यामुळे त्यांचा विजय जवळपास निश्चित मानला जात आहे. या निवडणुकीत महायुतीने एकजूट दाखवत सर्व घटक पक्षांमध्ये समन्वय साधल्याचे चित्र दिसून आले.
उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या प्रक्रियेदरम्यान विविध मतदारसंघांत राजकीय घडामोडींना वेग आला होता. काही ठिकाणी पक्षांतर्गत नाराजी, इच्छुक उमेदवारांची समजूत आणि वरिष्ठ नेत्यांच्या हस्तक्षेपामुळे अखेर महायुतीचे अधिकृत उमेदवार बिनविरोध निवडीच्या दिशेने पोहोचले.
या निवडीमुळे आगामी काळात विधान परिषदेत महायुतीचे वर्चस्व अधिक दृढ होणार असून राज्यातील राजकीय समीकरणांवरही त्याचा परिणाम होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. महायुतीच्या नेत्यांनी या विजयाचे श्रेय पक्ष नेतृत्व, कार्यकर्ते आणि स्थानिक स्वराज्य संस्थांतील लोकप्रतिनिधींना दिले आहे.






