अलिबाग (प्रतिनिधी): मांडवा सागरी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील सारळ आदिवासीवाडी ते तिनविरा परिसरात घडलेल्या वृद्ध महिलेच्या हत्या प्रकरणी दोन संशयितांविरुद्ध खुनासह अपहरण व पुरावा नष्ट केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सुनंदा लक्ष्मण पाटील (वय ८५, रा. सारळ आदिवासीवाडी, ता. अलिबाग) या महिलेच्या बेपत्ता होण्याची चौकशी सुरू असताना धक्कादायक माहिती समोर आली. महिलेकडील सोन्याचे दागिने लुटण्याच्या उद्देशाने आरोपींनी संगनमत करून तिचे अपहरण केले व खून केल्याचा आरोप आहे. त्यानंतर गुन्ह्याचे पुरावे नष्ट करण्यासाठी मृतदेहाची अज्ञात ठिकाणी विल्हेवाट लावल्याचे तपासात निष्पन्न झाले.
या प्रकरणी मांडवा सागरी पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक ७१/२०२६ दाखल करण्यात आला असून भारतीय न्याय संहिता (BNS) कलम १०३(१), २३८(अ), ६१(२), १४०(१), ३(५) तसेच कलम ३०२, २०१, १२०(ब), ३६४ आणि ३४ अन्वये गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
या प्रकरणातील आरोपी म्हणून अनदर्श हिराजी शेडगे (वय ३२) व रितेश नरेश लोहार (वय २०), दोघेही रा. तिनविरा, ता. अलिबाग, यांची नावे समोर आली असून त्यांना ताब्यात घेण्यात आले आहे. अटकेची प्रक्रिया सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली.
सरकारी फिर्यादी म्हणून पोलीस कर्मचारी जितेंद्र गुरुनाथ चवरकर यांनी तक्रार दिली आहे. या गंभीर गुन्ह्याचा तपास पोलीस निरीक्षक एस. व्ही. लांडे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू असून उपविभागीय पोलीस अधिकारी माया मोरे यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली आहे.
मिसिंग प्रकरणाच्या चौकशीतून उघडकीस आलेल्या या हत्याकांडामुळे परिसरात खळबळ उडाली आहे.






