अलिबाग (प्रतिनिधी): रायगड जिल्ह्यातील पत्रकारिता क्षेत्रात आपली वेगळी ओळख निर्माण करणाऱ्या ‘मेट्रो रायगड’ या प्रकाशन आज रायगडचे जिल्हाधिकारी किशन जावळे यांच्या हस्ते करण्यात आले. जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित करण्यात आलेल्या या कार्यक्रमाला जिल्ह्यातील अनेक ज्येष्ठ व मान्यवर पत्रकारांची उपस्थिती लाभली.
यावेळी जिल्हाधिकारी किशन जावळे यांनी ‘मेट्रो रायगड’च्या पुढील वाटचालीस शुभेच्छा देत, स्थानिक प्रश्न, विकासकामे आणि जनहिताच्या विषयांना न्याय देणारी पत्रकारिता करण्याचे आवाहन केले. समाजातील विविध घटकांपर्यंत वस्तुनिष्ठ व विश्वासार्ह माहिती पोहोचविण्यात माध्यमांची भूमिका महत्त्वाची असल्याचे त्यांनी नमूद केले.
कार्यक्रमात ‘मेट्रो रायगड’चे संपादक धनंजय कवठेकर यांनी उपस्थित मान्यवरांचे स्वागत करून जिल्हाधिकारी किशन जावळे यांचे तसेच उपस्थित पत्रकार बांधवांचे आभार मानले. ‘मेट्रो रायगड’च्या माध्यमातून रायगड जिल्ह्यातील घडामोडी, सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक आणि विकासात्मक विषयांवर प्रभावीपणे प्रकाश टाकण्याचा प्रयत्न राहील, असे त्यांनी सांगितले.
या प्रकाशन सोहळ्यास सर्व ज्येष्ठ पत्रकार सुभाष म्हात्रे, प्रफुल्ल पवार, रत्नाकर पाटील, जितेंद्र शिगवण, प्रकाश सोनावडेकर, रमेश कांबळे, प्रमिला जोशी, भारत राजणकर, अविनाश घाडगे, महेंद्र दुसार यांच्यासह जिल्ह्यातील अनेक पत्रकार उपस्थित होते. कार्यक्रम उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला.





