श्रीबाग स्मशानभूमीचे नूतनीकरण पूर्ण; वैकुंठधाम पुन्हा लोकसेवेत


अलिबाग (प्रतिनिधी) : अलिबाग नगरपालिकेच्या वीज व बांधकाम सभापती मा. प्रशांत नाईक यांच्या मार्गदर्शनाखाली श्रीबाग स्मशानभूमीचे नूतनीकरणाचे काम पूर्ण करण्यात आले असून, अत्याधुनिक व सुस्थित सुविधांसह वैकुंठधाम आज पुन्हा नागरिकांच्या सेवेसाठी खुले करण्यात आले.
या प्रसंगी नगराध्यक्षा, उपनगराध्यक्षा, मुख्याधिकारी, वीज व बांधकाम सभापती, पाणीपुरवठा सभापती, महिला व बालकल्याण उपसभापती तसेच नगरसेवक व नगरसेविका उपस्थित होते. मान्यवरांच्या हस्ते वैकुंठधामाचे लोकार्पण करून ते नागरिकांच्या सेवेसाठी सुपूर्द करण्यात आले.
शहरातील नागरिकांना अंत्यसंस्काराच्या वेळी स्वच्छ, सुरक्षित आणि सुसज्ज सुविधा उपलब्ध व्हाव्यात, या उद्देशाने स्मशानभूमीचे नूतनीकरण करण्यात आले आहे. परिसराची स्वच्छता, आवश्यक बांधकाम दुरुस्ती, मूलभूत सुविधांची उभारणी आणि सुशोभीकरणाची कामे या प्रकल्पांतर्गत करण्यात आली आहेत.
यावेळी बोलताना मा. प्रशांत नाईक यांनी सांगितले की, अलिबाग शहरवासीयांना दिलेले सर्वांगीण विकासाचे वचन पूर्ण करण्यासाठी नगरपालिका सातत्याने प्रयत्नशील आहे. शहराच्या विकासाबरोबरच नागरिकांच्या दैनंदिन गरजांशी निगडित असलेल्या सुविधांमध्ये सुधारणा करणे ही लोकप्रतिनिधी म्हणून आपली जबाबदारी असून, वैकुंठधामाचे नूतनीकरण पूर्ण झाल्याचा मनस्वी आनंद होत असल्याचे त्यांनी नमूद केले.
अलिबाग नगरपालिकेच्या माध्यमातून शहरातील विविध विकासकामांना गती देण्यात येत असून, नागरिकांना अधिक दर्जेदार नागरी सुविधा उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न भविष्यातही सुरू राहणार असल्याचा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला.