उरणमधील जेएसडब्ल्यूच्या लिक्विड जेट्टीवर जबर दुर्घटना; दोघे दगावले !


उरण (प्रतिनिधी): उरणमधील जेएनपीएच्या तरल पदार्थांची हाताळणी करणाऱ्या जेएसडब्ल्यू कंपनीच्या जेट्टीवर १० इंचाच्या पाइपलाइनमध्ये रविवारी सकाळी पिगिंगचे काम सुरू असताना भीषण अपघात घडला. या भीषण अपघातात गणेश बॅन्जो प्लास्ट कंपनीचा लोडिंग ऑफिसर राजेंद्र शिंदे वय ३२ वर्ष  व खासगी कंपनीचा जगन्नाथ गावंड वय ५४ वर्ष या २ कामगारांचा जागीच अंत झाला आहे. या भीषण अपघातानंतर येथील रासायनिक कंपन्यांच्या कामगारांमध्ये खळबळ माजली आहे.
रविवारी सकाळी ९ ते साडे ९ वाजेदरम्यान जेएसडब्ल्यू या कंपनीच्या जेट्टीवर असलेल्या दहा इंच व्यासाच्या पाइपलाइनमध्ये देखभाल, तपासणी, साफसफाई करण्यासाठी पिंगिंगचे काम सुरू होते. स्क्रॅपर हे उपकरण पाइपलाइनमधून आत पाठविले जाते. मात्र, पिंगिंगचे काम सुरू असतानाच स्क्रॅपर हे उपकरण पाइपलाइनमधून अत्यंत वेगाने बाहेर येऊन कामगारांवर आदळले. या भीषण अपघातात दोन कामगारांचा जागीच अंत झाला.
अपघातानंतर दोन्ही कामगारांना उपचारासाठी जेएनपीएच्या इस्पितळात दाखल करण्यात आले. मात्र, डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. त्यानंतर दोघांचे शव उरण येथील इंदिरा गांधी ग्रामीण रुग्णालयात नेण्यात आले. अपघात निष्काळजीपणामुळे की अन्य कारणांमुळे झाला याचा उलगडा तपासानंतर होणार आहे. तूर्तास अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आल्याची माहिती न्हावा-शेवा पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक दीपक सुर्वे यांनी दिली.
शव PM साठी पाठविण्यापूर्वी मृतांच्या नातेवाइकांनी आर्थिक नुकसानभरपाईची मागणी केली होती. त्यामुळे पोलिसांनाही पुढील कार्यवाही करण्यास विलंब झाला. यादरम्यान कंपनी अधिकारी, कंत्राटदार यांच्यात आर्थिक नुकसानीवर चर्चा झाली. याबाबत कोणता तोडगा निघाला याची सविस्तर माहिती वरिष्ठ अधिकारीच देऊ शकतील, असे जीबीएल कंपनीच्या व्यवस्थापन विभागाकडून सांगण्यात आले.