खोपोली(दत्तात्रेय शेंडगे): मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावरील नव्याने सुरू करण्यात आलेल्या मिसिंग लिंक प्रकल्पाच्या पुलावर तीन कारांचा विचित्र अपघात घडला. या अपघातात सुदैवाने कोणतीही जीवितहानी अथवा दुखापत झाली नसली तरी तिन्ही वाहनांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, मुंबईहून पुण्याकडे जाणारी फोर्च्युनर कार (एमएच ०५ सीएच ३५१२) चालक विजय नारायण खाडे (वय ३९, रा. करंजाडे, पनवेल) हे चालवत होते. मिसिंग लिंकवरील पुलाजवळ आल्यानंतर त्यांनी अचानक ब्रेक मारत वाहन तिसऱ्या लेनमध्ये वळविले. त्याचवेळी पाठीमागून भरधाव वेगाने येणाऱ्या वेरणा कारने (एपी ३९ एलडब्ल्यू ९९७९) फोर्च्युनरला जोरदार धडक दिली.
या धडकेनंतर वेरणा कारच्या मागून येणाऱ्या एक्सयूव्ही कारने (एमएच ०२ डीझेड ८६४०) देखील वेग नियंत्रणात न राहिल्याने वेरणा कारला पाठीमागून धडक दिली. त्यामुळे क्षणार्धात तीन वाहनांची साखळी धडक होऊन अपघात घडला.
अपघाताची तीव्रता मोठी असली तरी तिन्ही वाहनांतील प्रवासी सुखरूप बचावले. मात्र, तिन्ही कारचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून काही काळ वाहतुकीवर परिणाम झाला.
घटनेची माहिती मिळताच बोरघाट महामार्ग पोलीस तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी आणि महामार्ग यंत्रणेने क्रेनच्या सहाय्याने अपघातग्रस्त वाहने रस्त्याच्या बाजूला हलवून वाहतूक सुरळीत केली. त्यामुळे संभाव्य वाहतूक कोंडी टळली.
दरम्यान, द्रुतगती मार्गावरील वाढता वेग, अचानक लेन बदलणे आणि सुरक्षित अंतर न राखणे ही अपघातांची प्रमुख कारणे ठरत असल्याचे पुन्हा एकदा या घटनेतून समोर आले आहे. वाहनचालकांनी महामार्गावर वाहन चालविताना वेगमर्यादेचे पालन करावे तसेच पुढील वाहनापासून सुरक्षित अंतर राखावे, असे आवाहन पोलिसांकडून करण्यात आले आहे.
Home ताज्या बातम्या खोपोलीजवळ मुंबई-पुणे मिसिंग लिंकवर तीन कारांचा विचित्र अपघात; सुदैवाने जीवितहानी टळली





