अलिबाग (प्रतिनिधी) : अलिबाग समुद्रकिनाऱ्यावर रविवारी दुपारी कल्याण येथील एकाच कुटुंबातील पाच तरुण खोल पाण्यात ओढले गेल्यानंतर अलिबाग नगरपालिकेच्या जीवरक्षक (लाइफ गार्ड) पथकाने, पोलिस बीट मार्शल व दामिनी पथकाने धाडसी बचावकार्य करत त्यांना सुखरूप किनाऱ्यावर आणले. या उल्लेखनीय कामगिरीबद्दल अलिबाग नगर परिषदेतर्फे संबंधित बचाव पथकाचा सत्कार करण्यात आला.
यावेळी प्रभारी नगराध्यक्षा ॲड. मानसी म्हात्रे, माजी नगराध्यक्ष प्रशांत नाईक, मुख्याधिकारी (सीओ) सागर साळुंखे तसेच नगरसेवक उपस्थित होते. उपस्थित मान्यवरांनी बचाव पथकाच्या तत्परतेचे आणि धाडसाचे कौतुक करत त्यांच्या कार्याचा गौरव केला.
समुद्रातील पाण्याचा अंदाज न आल्याने हे तरुण अडचणीत सापडले होते. नागरिकांनी मदतीसाठी आरडाओरडा केल्यानंतर बचाव पथकाने तातडीने घटनास्थळी धाव घेतली आणि अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत सर्वांना सुरक्षित बाहेर काढले. या वेळी दाखविलेल्या धाडसामुळे मोठी दुर्घटना टळली.
सुरक्षिततेच्या दृष्टीने समुद्रात उतरताना पर्यटकांनी आवश्यक खबरदारी घ्यावी, असे आवाहनही यावेळी करण्यात आले.





