अलिबाग-रोहा मार्गावरील वेलवली-खानाव पुलाचे काम पूर्ण; वाहतुकीसाठी खुला


अलिबाग (प्रतिनिधी) : अलिबाग-रोहा मार्गावरील वाहतुकीच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा असलेला वेलवली-खानाव येथील पूल अखेर पूर्णत्वास जाऊन रविवार, २२ जून रोजी वाहतुकीसाठी खुला करण्यात आला. या पुलामुळे परिसरातील नागरिक, शेतकरी, विद्यार्थी तसेच नोकरदार वर्गाला मोठा दिलासा मिळाला आहे.
या पुलाच्या बांधकामास प्रत्यक्ष १ एप्रिल २०२६ रोजी सुरुवात करण्यात आली होती. अवघ्या काही महिन्यांत काम पूर्ण करून पुलावरील वाहतूक सुरू करण्यात आल्याने स्थानिक नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे. पुलाच्या उद्घाटनप्रसंगी नारळ फोडून वाहतुकीस प्रारंभ करण्यात आला.
यावेळी नवनिर्वाचित जिल्हा परिषद सदस्य अनंत गोंधळी, खानाव ग्रामपंचायत सदस्य सुरेश पाटील, सामाजिक कार्यकर्ते सुरज घरत, दत्ता सुतार, श्री. देशमुख, नदीम बेबन, सचिन पावशे, करण म्हात्रे, आशिष ठाकूर यांच्यासह मोठ्या संख्येने स्थानिक ग्रामस्थ उपस्थित होते.
पूल सुरू झाल्यामुळे अलिबाग-रोहा मार्गावरील वाहतूक अधिक सुरक्षित व सुरळीत होणार असून परिसरातील गावांचा संपर्कही अधिक मजबूत झाला आहे. विशेषतः पावसाळ्यात नागरिकांना होणाऱ्या अडचणी दूर होण्यास मदत होणार आहे. स्थानिकांच्या मागणीची दखल घेत अल्पावधीत हे काम पूर्ण करण्यात आल्याने उपस्थितांनी संबंधित यंत्रणा व कामगारांचे कौतुक केले.
नागरिकांच्या दैनंदिन प्रवासासाठी महत्त्वाचा ठरणारा हा पूल सुरू झाल्याने परिसरातील विकासाला चालना मिळणार असून वाहतुकीचा वेळही मोठ्या प्रमाणात वाचणार आहे.