अलिबाग(प्रतिनिधी): जिल्हा रुग्णालय, रायगड अलिबाग येथे १९ जून रोजी जागतिक सिकलसेल दिनाचे औचित्य साधून विशेष जनजागृती आणि तपासणी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात उपस्थित रुग्ण, गरोदर माता आणि नागरिकांना सिकलसेल आजाराविषयी सविस्तर प्राथमिक माहिती देऊन जनजागृती करण्यात आली, तसेच ६२ नागरिकांची सिकलसेल सोल्यूबिलीटी तपासणी करण्यात आली.
या कार्यक्रमाप्रसंगी जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. निशीकांत पाटील, प्रभारी अतिरीक्त जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. स्वाती नाईक यांच्यासह सहायक अधीसेविका अनिता भोपी, रुग्णालयातील वरिष्ठ अधिकारी, कर्मचारी, परिचारिका (स्टाफ), नर्सिंगच्या विद्यार्थिनी, गरोदर माता आणि इतर रुग्ण मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमादरम्यान उपस्थितांना सिकलसेल आजाराची प्राथमिक व महत्त्वाची माहिती देण्यात आली. सिकलसेल हा एक अनुवांशिक रक्ताचा आजार आहे, जो पालकांकडून त्यांच्या मुलांमध्ये संक्रमित होतो. सामान्यतः रक्तातील तांबड्या पेशी (RBC) या गोल आणि लवचिक असतात, ज्यामुळे शरीराला पुरेसा ऑक्सिजन मिळतो. मात्र, सिकलसेल आजारात या पेशींचा आकार बदलून तो विळ्यासारखा (अर्धचंद्राकृती) कडक होतो. या कडक पेशी रक्तवाहिन्यांमध्ये अडथळा निर्माण करतात, ज्यामुळे शरीरातील ऑक्सिजनचा पुरवठा खंडित होतो. परिणामी, रुग्णाला तीव्र अंगदुखी, सांधेदुखी, थकवा आणि ॲनिमिया यांसारख्या त्रासाला सामोरे जावे लागते. गरोदर मातांची वेळेत तपासणी केल्यास हा आजार पुढील पिढीत जाण्यापासून रोखता येऊ शकतो, यावर यावेळी भर देण्यात आला.
सिकलसेल समुपदेशक प्रतिम सुतार यांनी उपस्थितांना मार्गदर्शन करताना आजाराची लक्षणे, घ्यावयाची काळजी आणि उपचारांचे महत्त्व याविषयी सविस्तर समुपदेशन केले. तर प्रयोगशाळा तंत्रज्ञ दिपा म्हात्रे यांनी उपस्थित ६२ नागरिकांची सोल्यूबिलीटी (Solubility) तपासणी केली.
हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सिकलसेल समन्वयक प्रिती पाटील यांनी मार्गदर्शन केले. जिल्हा रुग्णालयाच्या या उपक्रमामुळे रुग्ण आणि सर्वसामान्य नागरिकांमध्ये सिकलसेल आजाराविषयी मोठी जनजागृती निर्माण झाली आहे.






