अलिबाग (प्रतिनिधी): भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार मतदार यादीच्या विशेष संक्षिप्त पुनरिक्षण कार्यक्रम-२०२६ ला सुरुवात झाली असून, अलिबाग विधानसभा मतदारसंघात बूथ लेव्हल ऑफिसर (BLO) मार्फत घराघरांत जाऊन मतदारांची माहिती पडताळण्याची मोहीम राबविण्यात येणार आहे. या उपक्रमाद्वारे मतदार यादी अधिक अचूक, अद्ययावत आणि त्रुटीमुक्त करण्यावर भर दिला जाणार आहे.
या कार्यक्रमासाठी १ ऑक्टोबर २०२६ ही पात्रता तारीख निश्चित करण्यात आली आहे. पुनरिक्षणाच्या तयारी, प्रशिक्षण आणि छपाईचे काम २० जून ते २९ जून २०२६ या कालावधीत पार पडणार आहे. त्यानंतर ३० जून ते २९ जुलै २०२६ या कालावधीत BLO अधिकारी घरभेटी देऊन मतदारांची माहिती संकलित करतील.
मतदान केंद्रांचे सुसूत्रीकरण २९ जुलै २०२६ पर्यंत पूर्ण करण्यात येणार असून, ५ ऑगस्ट २०२६ रोजी प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध केली जाईल. त्यानंतर नागरिकांना दावे व हरकती नोंदविण्यासाठी ५ ऑगस्ट ते ४ सप्टेंबर २०२६ हा कालावधी उपलब्ध असेल. प्राप्त दावे आणि हरकतींची छाननी करून त्यांचा निपटारा ३ ऑक्टोबर २०२६ पर्यंत केला जाणार आहे. अंतिम मतदार यादी ७ ऑक्टोबर २०२६ रोजी प्रसिद्ध होणार आहे.
अधिकृत आकडेवारीनुसार, १९२-अलिबाग विधानसभा मतदारसंघातील मतदारसंख्या ३ लाख ५ हजार ६८० इतकी आहे. यापैकी BLO मार्फत आतापर्यंत २ लाख ३८ हजार ७८४ मतदारांचे मॅपिंग पूर्ण झाले असून, ७० हजार ३८९ मतदारांचे मॅपिंग अद्याप बाकी आहे.
मतदान केंद्रावरील मतदारांची कमाल मर्यादा १,२०० निश्चित करण्यात आली आहे. अलिबाग मतदारसंघात सध्या ३७५ मतदान केंद्रे असून, त्यापैकी ३९ मतदान केंद्रांवर १,२०० किंवा त्यापेक्षा अधिक मतदार असल्याने या केंद्रांचे विभाजन करण्याची प्रक्रिया हाती घेतली जाणार आहे.
दरम्यान, BLO अधिकारी घरभेटीदरम्यान निवडणूक आयोगाकडून उपलब्ध करून देण्यात आलेल्या Enumeration Form मध्ये मतदारांची माहिती भरून घेतील. ज्या मतदारांचे मॅपिंग झालेले नाही, त्यांनी आयोगाने मान्य केलेल्या आवश्यक कागदपत्रांपैकी कोणतेही तीन पुरावे सादर करणे आवश्यक राहणार आहे.
नागरिकांनी आपल्या नावाची नोंद मतदार यादीत आहे की नाही, तसेच कुटुंबीयांची माहिती योग्य आहे का, याची खात्री करण्यासाठी निवडणूक आयोगाच्या अधिकृत संकेतस्थळावर भेट देण्याचे आवाहन प्रशासनाने केले आहे. तसेच BLO अधिकारी नागरिकांना घरपोच भेट देऊन आवश्यक मार्गदर्शन करणार असल्याचेही सांगण्यात आले आहे.
Home ताज्या बातम्या मतदार यादी विशेष संक्षिप्त पुनरिक्षण कार्यक्रम २०२६; अलिबाग मतदारसंघात घराघरांत जाऊन पडताळणी





