अलिबाग (प्रतिनिधी): अलिबाग समुद्रकिनाऱ्यावर रविवारी दुपारी पोहत असताना कल्याण येथील एकाच कुटुंबातील पाच तरुण अचानक खोल पाण्यात ओढले गेल्याने एकच खळबळ उडाली. समुद्रातील पाण्याचा अंदाज न आल्याने हे तरुण अडचणीत सापडले होते. त्यांना बुडताना पाहून उपस्थित नागरिकांनी आरडाओरडा करून मदतीची हाक दिली.
घटनेची माहिती मिळताच अलिबाग नगरपालिकेच्या जीवरक्षक (लाइफ गार्ड) पथकाने तत्काळ समुद्रात धाव घेत बचावकार्य सुरू केले. यावेळी पोलिस बीट मार्शल आणि दामिनी पथकानेही तातडीने मदतीसाठी पुढाकार घेतला. अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत समन्वयाने राबविलेल्या बचाव मोहिमेमुळे एकामागून एक सर्व पाचही तरुणांना सुरक्षितपणे किनाऱ्यावर आणण्यात यश आले.
या धाडसी आणि तत्पर बचावकार्यातून मोठी दुर्घटना टळली. आपल्या मुलांचे प्राण वाचवल्याबद्दल संबंधित तरुणांच्या पालकांनी लाइफ गार्ड, बीट मार्शल आणि दामिनी पथकाचे मनापासून आभार मानले. या घटनेमुळे समुद्रात उतरताना आवश्यक खबरदारी घेण्याचे महत्त्व पुन्हा अधोरेखित झाले आहे.





