रायगड पोलीस दलाच्या शिरपेचात मानाचा तुरा; एनएसजीच्या आंतरराष्ट्रीय प्रशिक्षणात रेश्मा डफळ यांचे उल्लेखनीय यश


अलिबाग (प्रतिनिधी): रायगड पोलीस दलातील महिला अधिकारी रेश्मा सुदाम डफळ यांनी नॅशनल सिक्युरिटी गार्ड (एनएसजी) आयोजित आंतरराष्ट्रीय संरक्षण व सुरक्षा विषयक अत्यंत खडतर प्रशिक्षणामध्ये उल्लेखनीय यश संपादन करत रायगड जिल्ह्यासह महाराष्ट्राचे नाव उंचावले आहे. त्यांच्या या यशाबद्दल रायगडच्या पोलीस अधीक्षक आँचल दलाल यांनी त्यांचे विशेष अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत.
हरियाणा राज्यातील मानेसर येथे एनएसजीतर्फे आयोजित करण्यात आलेल्या ४५ दिवसांच्या आंतरराष्ट्रीय प्रशिक्षण कार्यक्रमात जगातील तब्बल ४६ देशांतील पोलीस व संरक्षण विभागातील अधिकारी सहभागी झाले होते. या प्रतिष्ठित प्रशिक्षणात भारतातून सहभागी झालेल्या रेश्मा डफळ या एकमेव महिला पोलीस अधिकारी ठरल्या. त्यामुळे त्यांच्या सहभागाकडे सुरुवातीपासूनच विशेष लक्ष लागले होते.
संरक्षण, दहशतवादविरोधी कारवाया, आपत्कालीन परिस्थिती हाताळणी, सुरक्षा व्यवस्थापन, नेतृत्व कौशल्य आणि शारीरिक क्षमता अशा विविध विषयांवर आधारित या प्रशिक्षणात सहभागी अधिकाऱ्यांची कठोर परीक्षा घेण्यात आली. रेश्मा डफळ यांनी या सर्व टप्प्यांमध्ये उत्कृष्ट कामगिरी करत ‘ए-१ ग्रेडिंग’मध्ये पाचवा क्रमांक पटकावला. आंतरराष्ट्रीय स्तरावरील या यशामुळे रायगड पोलीस दलाच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा खोवला गेला आहे.
महिला अधिकारी म्हणून अत्यंत स्पर्धात्मक आणि आव्हानात्मक प्रशिक्षणात त्यांनी दाखविलेली कामगिरी प्रेरणादायी असल्याचे मानले जात आहे. त्यांच्या यशामुळे राज्यातील महिला पोलिसांमध्ये नवचैतन्य निर्माण होणार असून भविष्यात अधिकाधिक महिला अधिकारी अशा राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय प्रशिक्षण कार्यक्रमांमध्ये सहभागी होण्यासाठी प्रेरित होतील, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.
रेश्मा डफळ यांच्या या उल्लेखनीय यशाबद्दल पोलीस दलासह विविध स्तरांतून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. रायगड पोलीस दलासाठी ही अभिमानास्पद बाब मानली जात असून त्यांच्या यशामुळे जिल्ह्याच्या नावाला राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर नवी ओळख मिळाली आहे.