निरोगी आणि आनंदी राहण्यासाठी योग महत्वाचे — जिल्हाधिकारी किशन जावळे


रायगड – अलिबाग (जिमाका): प्रत्येकाने निरोगी आणि आनंदी राहण्यासाठी आपल्या जीवनात योग करणे अत्यंत महत्वाचे आहे, असे प्रतिपादन जिल्हाधिकारी किशन जावळे यांनी आज केले.
जिल्हा प्रशासन व जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने जिल्हा क्रीडा संकुल, नेहूली येथील प्रशस्त बॅडमिंटन हॉल येथे आयोजित आंतरराष्ट्रीय योग दिन कार्यक्रमाप्रसंगी ते बोलत होते.

यावेळी रायगड जिल्हा परिषद अध्यक्ष मंगेश वाकडीकर, ॲड. निहा राऊत, तालुका क्रीडा अधिकारी राजेंद्र अतनूर, क्रीडा अधिकारी सुचिता ढमाले, राष्ट्रीय युवा पुरस्कारार्थी तथा प्रिझम संस्थेच्या अध्यक्षा तपस्वी नंदकुमार गोंधळी, स्वयंसिद्धा संस्थेच्या अध्यक्षा सुचिता साळवी, क्रीडा विभागाचे आकाश डोंगरे, श्री अंबिका योग कुटीरचे संस्थापक विरेंद्र पवार या संस्थेचे प्रशिक्षक तसेच प्रिझम सामाजिक विकास संस्थेचे स्वयंसेवक, पी.एन.पी.शाळेचे विद्यार्थी व शिक्षक वृंद, स्पर्धा विश्व अकॅडमीचे प्रशिक्षणार्थी, सरकारी अधिकारी, कर्मचारी, आदी उपस्थित होते.

यावेळी जिल्हाधिकारी म्हणाले की, आपल्या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संयुक्त राष्ट्र महासभेत भाषण करताना संपूर्ण जगाला योगाचे महत्त्व पटवून दिले. संयुक्त राष्ट्र महासभेने अधिकृतपणे 21 जून हा ‘आंतरराष्ट्रीय योग दिन’ म्हणून घोषित केला. अप्राप्त वस्तू प्राप्त होणे याला योग म्हणतात. प्राणायाम ध्यान आसने यातून मानसिक एकाग्रता वाढते. यातून आपल्याला जे साध्य करायचे आहे ते साध्य होते. नेमून दिलेले कर्म विहित वेळेत, सातत्याने केले तर आपण चांगल्या विश्वाची निर्मिती करू शकतो. एकाग्रता मिळवण्यासाठी योग केले पाहिजे आणि योगात सातत्य आवश्यक आहे आणि आयुष्यात शिस्तीची गरज आहे. शिस्त योगाद्वारे लागते, आरोग्य सुधारते. आज प्रत्येकाला ताण-तणावाला सामोरे जावे लागते. त्यामुळे तणावमुक्त राहण्यासाठी आपण सर्वांनी आपल्या जीवनशैलीमध्ये नियमितपणे योगा, व्यायामांचा समावेश करावा. योग हा फक्त व्यायाम नसून योगामुळे शारिरीक, मानसिक आरोग्य सुदृढ राहते. नियमित योगासने केल्याने शरीराला ऊर्जा प्राप्त होत असते. योगामुळे मनःशांती तर मिळतेच शिवाय तणाव दूर होऊन एकाग्रता सुध्दा वाढण्यास मदत होते, असेही जिल्हाधिकारी म्हणाले.