कार्लेखिंड(प्रतिनिधी) : द लाइफ फाउंडेशनच्या वतीने अलिबाग व सुधागड तालुक्यातील जिल्हा परिषद शाळांमधील विद्यार्थ्यांसाठी मोठ्या प्रमाणावर वह्या वितरण उपक्रम यशस्वीपणे राबविण्यात आला. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य उपलब्ध करून देत त्यांच्या शिक्षणाला प्रोत्साहन देण्याच्या उद्देशाने हा उपक्रम आयोजित करण्यात आला.
या उपक्रमांतर्गत अलिबाग व सुधागड तालुक्यातील एकूण 321 जिल्हा परिषद शाळांमधील 10,153 विद्यार्थ्यांना 47,591 वह्यांचे वितरण करण्यात आले. नवीन शैक्षणिक वर्षाच्या सुरुवातीलाच विद्यार्थ्यांना आवश्यक शैक्षणिक साहित्य उपलब्ध व्हावे यासाठी हा उपक्रम राबविण्यात आला.
अलिबाग तालुक्यासाठी वह्या वितरण कार्यक्रम दि. 16 जून 2026 रोजी चेंढरे ग्रामपंचायत सभागृह येथे आयोजित करण्यात आला. या कार्यक्रमास गटशिक्षण अधिकारी श्री. कृष्णा नपिंगळे सर तसेच द लाइफ फाउंडेशनच्या सह-संस्थापक व व्यवस्थापकीय विश्वस्त सौ. पूनम लालवानी मॅडम प्रमुख उपस्थित होत्या. त्यांच्या हस्ते शाळांच्या प्रतिनिधींना वह्यांचे वितरण करण्यात आले.
तर सुधागड तालुक्यातील कार्यक्रम दि. 17 जून 2026 रोजी रा. जि. प. शाळा पाली क्रमांक 2 येथे संपन्न झाला. या कार्यक्रमास गटशिक्षण अधिकारी श्री. बांगरे सर तसेच पाली पोलीस ठाण्याच्या पोलीस निरीक्षक सौ. हेमलता शेरेकर मॅडम विशेष अतिथी म्हणून उपस्थित होत्या. त्यांनी विद्यार्थ्यांना शिक्षणाचे महत्त्व पटवून देत शुभेच्छा दिल्या.
या उपक्रमाच्या यशस्वी अंमलबजावणीसाठी शिक्षण विभाग, मुख्याध्यापक, शिक्षक, स्वयंसेवक आणि स्थानिक प्रशासन यांचे मोलाचे सहकार्य लाभले. सर्व लाभार्थी शाळांपर्यंत नियोजनबद्ध पद्धतीने वह्यांचे वितरण करण्यात आले.
द लाइफ फाउंडेशन गेल्या अनेक वर्षांपासून शिक्षण, आरोग्य व सामाजिक विकास क्षेत्रात कार्यरत असून ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीसाठी सातत्याने विविध उपक्रम राबवत आहे. या वह्या वितरण उपक्रमामुळे हजारो विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याची मदत मिळाली असून त्यांच्या शिक्षणाला नवी प्रेरणा मिळणार आहे.
या यशस्वी उपक्रमासाठी सहकार्य करणारे शिक्षण विभाग, शाळा प्रशासन, स्वयंसेवक, आणि सर्व हितचिंतकांचे द लाइफ फाउंडेशनने मनःपूर्वक आभार मानले.
“शिक्षणाच्या माध्यमातून जीवनात सकारात्मक बदल घडवून उज्ज्वल भविष्य घडविण्याच्या दिशेने हे एक महत्त्वपूर्ण पाऊल आहे,” असे फाउंडेशनतर्फे सांगण्यात आले.






