मतदार नोंदणी व पुनरिक्षण प्रक्रियेबाबत बीएलओ प्रशिक्षण उत्साहात


कार्यक्रम संपन्न करण्यासाठी कॉग्रेस जिल्हाध्यक्ष राजाभाऊ ठाकूर यांनी अथक प्रयत्न केले.

अलिबाग (प्रतिनिधी) : मतदार याद्यांच्या विशेष सखोल पुनरिक्षण कार्यक्रमाच्या पार्श्वभूमीवर बीएलओ (बूथ लेव्हल ऑफिसर) आणि बीएलओ सुपरवायझर यांच्यासाठी आयोजित प्रशिक्षण कार्यक्रम उत्साहात पार पडला. या प्रशिक्षणामध्ये मतदार नोंदणी, नाव कायम ठेवण्याची प्रक्रिया, तसेच मतदानाचा घटनादत्त अधिकार अबाधित राखण्यासाठी आवश्यक असलेल्या विविध बाबींचे सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले.
महाराष्ट्रात सुरू असलेल्या या विशेष कार्यक्रमांतर्गत प्रशिक्षणाचे आयोजन करण्यात आले होते. प्रशिक्षक अजित देसाई आणि सूरज यांच्या मार्गदर्शनाखाली प्रशिक्षणाची प्रभावी अंमलबजावणी करण्यात आली. कार्यक्रमात बीएलओ-१ आणि बीएलओ-२ यांच्या जबाबदाऱ्या, मतदार याद्यांमध्ये नाव समाविष्ट करणे, नाव कायम ठेवणे, तसेच आवश्यक अर्ज व प्रक्रिया याबाबत सखोल माहिती देण्यात आली.
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी देशातील प्रत्येक नागरिकाला दिलेला मतदानाचा अधिकार कायम सुरक्षित आणि सक्षम राहावा, यासाठी मतदार यादी अचूक असणे अत्यंत आवश्यक असल्याचे यावेळी अधोरेखित करण्यात आले. प्रत्येक पात्र नागरिकाचे नाव मतदार यादीत कायम राहण्यासाठी आवश्यक अर्ज वेळेत भरावा, असे आवाहनही करण्यात आले.
प्रशिक्षणात जिल्ह्यातील सुमारे १०० ते २०० कार्यकर्त्यां सहभागी झाले होते. गावोगावी जाऊन मतदारांची पडताळणी करणे, त्यांच्या नावांची खात्री करणे आणि मतदार यादी अद्ययावत ठेवण्याची संपूर्ण प्रक्रिया प्रशिक्षणाद्वारे समजावून सांगण्यात आली.
सुमारे साडेतीन तास चाललेल्या या प्रशिक्षण कार्यक्रमात उपस्थितांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला. मार्गदर्शनातून मतदार नोंदणी प्रक्रियेविषयी अधिक स्पष्टता मिळाल्याची भावना सहभागींकडून व्यक्त करण्यात आली. प्रशिक्षणामुळे निवडणूक प्रक्रियेत अधिक प्रभावीपणे काम करण्यासाठी आवश्यक ज्ञान आणि आत्मविश्वास प्राप्त झाल्याचेही सहभागी म्हणाले.