रायगडमध्ये मुसळधार पावसाचा प्रभाव; अंबा नदीने धोक्याची पातळी ओलांडली, कुंडलिका इशारा पातळीवर


अलिबाग (प्रतिनिधी) : रायगड जिल्ह्यात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे नद्यांच्या पाणीपातळीत वाढ झाली असून, शुक्रवारी (३ जुलै) सकाळी ११.३० वाजेपर्यंतच्या अहवालानुसार रोहा तालुक्यातील अंबा नदीने धोक्याची पातळी ओलांडली आहे. त्यामुळे नदीकाठच्या गावांतील नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन प्रशासनाने केले आहे. तसेच कुंडलिका नदीची पाणीपातळीही इशारा पातळीच्या पुढे गेली असून प्रशासन परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवून आहे.

रायगड पाटबंधारे विभागाच्या पूर नियंत्रण कक्षाने प्रसिद्ध केलेल्या अहवालानुसार, रोहा तालुक्यातील नागोठणे बंधाऱ्याजवळील अंबा नदीची धोक्याची पातळी ९.०० मीटर असताना प्रत्यक्ष पाणीपातळी ९.१० मीटरपर्यंत पोहोचली आहे. त्यामुळे नदीकाठच्या सखल भागात खबरदारी घेण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

रोहा तालुक्यातील डोलवहाल बंधाऱ्याजवळील कुंडलिका नदीची इशारा पातळी २३.०० मीटर असून सध्याची पाणीपातळी २३.४० मीटर नोंदविण्यात आली आहे. त्यामुळे ही नदी इशारा पातळीच्या पुढे गेली असून प्रशासनाने सतर्कता वाढविली आहे.

दरम्यान, महाड येथील सावित्री नदीची पाणीपातळी ४.६० मीटर असून ती अद्याप इशारा पातळीपेक्षा कमी आहे. तसेच खालापूरमधील पाताळगंगा नदी, कर्जतमधील उल्हास नदी आणि पनवेलमधील गाढी नदी या सर्व नद्यांची पाणीपातळीही इशारा पातळीपेक्षा कमी असल्याचे अहवालात नमूद करण्यात आले आहे.

जिल्हा प्रशासन, पाटबंधारे विभाग आणि आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा परिस्थितीवर सातत्याने लक्ष ठेवून असून, नदीकाठच्या नागरिकांनी अफवांवर विश्वास न ठेवता प्रशासनाच्या सूचनांचे पालन करावे, असे आवाहन करण्यात आले आहे. तसेच आवश्यकतेनुसार सुरक्षित स्थळी स्थलांतर करण्यास तयार राहण्याचा सल्लाही देण्यात आला आहे.