आंबेनळी घाट ६ जुलैपर्यंत सर्व प्रकारच्या वाहतुकीसाठी बंद


अलिबाग (प्रतिनिधी): अतिवृष्टी, भूस्खलन आणि दरड कोसळण्याच्या वाढत्या धोक्यामुळे पोलादपूर–महाबळेश्वर (आंबेनळी) राज्य महामार्ग (SH-139) दि. ३ ते ६ जुलै २०२६ या कालावधीत सर्व प्रकारच्या वाहतुकीसाठी पूर्णपणे बंद ठेवण्याचे आदेश जिल्हादंडाधिकारी किशन ना. जावळे यांनी जारी केले आहेत.
महाराष्ट्र राज्य पायाभूत सुविधा विकास महामंडळाच्या अहवालानुसार, सह्याद्रीतील हा घाट भूस्खलनप्रवण असून मुसळधार पावसामुळे दरड कोसळणे, दगड घसरणे, रस्ता खचणे, वृक्ष पडणे आणि पाण्याचा वेग वाढणे अशा घटनांचा धोका निर्माण झाला आहे. दाट धुके आणि कमी दृश्य अंतरामुळे अपघाताची शक्यताही वाढली आहे.
तहसीलदार तथा तालुका आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण आणि रायगड पोलीस अधीक्षक यांच्या शिफारशीनुसार सार्वजनिक सुरक्षिततेच्या दृष्टीने हा निर्णय घेण्यात आला असून नागरिकांनी पर्यायी मार्गांचा वापर करून प्रशासनाला सहकार्य करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.