अँड राकेश पाटील यांची जिल्हा प्रशासनाकडे तक्रार
अलिबाग (प्रतिनिधी):खानाव गावालगत असणाऱ्या अलिबाग ते रोहा मार्गावरील बांधकाम विभागाच्या रस्त्याच्या कामामध्ये निकृष्ट दर्जाचे काम करून रस्त्याच्या मध्यभागी भले मोठे भगदाड पडलेले असून प्रत्यक्ष काम न करता शासकीय निधीची अफरातफर, खोटी बिले काढणे व नागरिकांच्या जीवितास धोका निर्माण केल्याबाबत संबंधित ठेकेदाराच्या विरुद्ध भारतीय न्याय संहिता, २०२३ मधील लागू होणाऱ्या तरतुदींनुसार गुन्हा दाखल करून कठोर कारवाई करून ठेकेदाराला काळया यादीत टाका अशी तक्रार तरुण सामाजिक कार्यकर्ते अँड राकेश नारायण पाटील यांनी कार्यकारी अभियंता सार्वजनिक बांधकाम विभाग रायगड अलिबाग,तसेच जिल्हा पोलिस अधिक्षक, जिल्हाधिकारी रायगड यांच्याकडे लेखी तक्रार दाखल केली आहे
त्यांनी तक्रार अर्जात नमूद केले आहे की,
अलिबाग ते रोहा रस्त्यावरून रोज प्रवास करीत असतो,
सदरच्या रस्त्यावर खानाव गावालगत असणाऱ्या सार्वजनिक बांधकाम विभागाच्या ठेकेदाराने दोन वर्षापूर्वी बांधलेल्या पुलाला मध्यभागी मोठे भगदाड पडलेले असून सदरचा पूल कधीही पडून जीवित हानी होण्याची शक्यता नाकारता येत नाही,
सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत या रस्त्याचे काम करण्याचा ठेका देण्यात येऊन काम न करताच बिलेही अदा केल्याची माहिती समोर येत आहे .
सदर ठेकेदाराने करारातील अटींचे पालन न करता अत्यंत निकृष्ट दर्जाचे काम केले आहे. तसेच प्रत्यक्षात काम पूर्ण न करताच किंवा अपूर्ण काम पूर्ण झाल्याचे भासवून शासकीय निधीची बिले काढून घेतल्याची गंभीर बाब निदर्शनास आली आहे.
सदर रस्त्याच्या मध्यभागी मोठा खड्डा/भागदाड पडले असून वाहनचालक व पादचाऱ्यांच्या जीवितास गंभीर धोका निर्माण झाला आहे. कोणत्याही क्षणी गंभीर अपघात होऊन जीवितहानी होण्याची शक्यता आहे. संबंधित अधिकारी व ठेकेदार यांनी त्यांच्या कायदेशीर कर्तव्यात निष्काळजीपणा करून शासनाची आर्थिक फसवणूक केली असून सार्वजनिक सुरक्षेलाही धोका निर्माण केला आहे.
संबंधित ठेकेदार, संबंधित अभियंता व जबाबदार अधिकारी यांच्याविरुद्ध सखोल चौकशी करण्यात यावी.
कामाची स्वतंत्र तांत्रिक गुणवत्ता तपासणी (Quality Audit) करण्यात यावी.
मोजमाप पुस्तिका (Measurement Book), बिले, देयक नोंदी, पूर्णत्व प्रमाणपत्र व इतर सर्व संबंधित कागदपत्रे जप्त करून तपासण्यात यावीत.
शासकीय निधीचा अपहार, फसवणूक, बनावट कागदपत्रांचा वापर, सार्वजनिक सेवकांच्या संगनमताचा पुरावा आढळल्यास भारतीय न्याय संहिता, २०२३ मधील लागू होणाऱ्या तरतुदींनुसार तसेच इतर लागू कायद्यांनुसार गुन्हा नोंद करण्यात यावा.
अपघात टाळण्यासाठी तातडीने रस्ता दुरुस्त करण्याचे आदेश देण्यात यावेत.
दोषी आढळणाऱ्या ठेकेदारास काळ्या यादीत (Blacklisting) टाकण्यासाठी संबंधित विभागास शिफारस करण्यात यावी
सदरच्या पुलाची तत्काळ डागडुजी करून पर्यायी रस्ता प्रवाशांसाठी तयार करण्यात यावा,
माझ्या तक्रारीची तातडीने दखल घेऊन कायदेशीर कारवाई करण्यात यावी.
————————————————-
सार्वजनिक बांधकाम विभागाचा अलिबाग रोहा रस्ता हा अपघातांसाठी कुप्रसिद्ध रस्ता म्हणून ओळखला जातो, या रस्त्याच्या ठेकेदाराने काम न करताच बिलाची रक्कम अदा केल्याची चर्चा आहे, सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांची टक्केवारी तरी नक्की किती? खर तर या विभागाच्या ठेकेदारांच्या बरोबरच अधिकाऱ्यांविरोधात जो पर्यंत गुन्हे दाखल होत नाहीत, तो पर्यंत हा रस्ता कोणालाही यमाच्या दरबारात पोहचवू शकतो?
अँड राकेश नारायण पाटील
प्रवासी,






