चक्रीवादळाचा तडाखा ! JNPA बंदरात कंटेनरसह ३ कामगार हवेत फेकले गेले


उरणच्या न्हावा शेवा फ्रीपोर्ट टर्मिनलमध्ये सकाळी घडली धक्कादायक घटना  

उरण (प्रतिनिधी): उरण तालुक्यात सुरू असलेल्या मुसळधार पाऊस आणि वादळी वाऱ्यांच्या तडाख्यामुळे जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झाले असतानाच, जेएनपीए बंदरातील न्हावा शेवा फिपोर्ट टर्मिनलमध्ये सोमवारी सकाळी एक धक्कादायक घटना घडली आहे. चक्रीवादळासदृश वादळी परिस्थितीत जहाजावरील कंटेनर उतरवण्याचे काम सुरू असताना कंटेनरसह ३ कामगार हवेत फेकले गेल्याची माहिती समोर आली आहे. या अपघातात जखमी झालेल्या ३ कामगारांपैकी दोघांची प्रकृती चिंताजनक असल्याचे समजते. मिळालेल्या माहितीनुसार, सोमवारी सकाळी न्हावा शेवा फिपोर्ट टर्मिनल येथे जहाजावरील कंटेनर उतरवण्याचे काम सुरू होते. याचवेळी अचानक वादळी वाऱ्यांचा वेग वाढल्याने काही कंटेनर हवेत उडाले आणि त्यासोबतच काम करणारे ३ कामगारही गंभीर अपघाताला बळी पडले. घटनेनंतर परिसरात एकच खळबळ उडाली होती. एवढी मोठी घटना घडल्या नंतरही आपत्ती व्यवस्थापन तसेच इतर सुविधा उपलब्ध न झाल्याने कामगार वर्गात नैराश्याचे वातावरण पसरले आहे.

दरम्यान, उरण तालुक्यात गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे अनेक भाग जलमय झाले असून नागरिकांचे दैनंदिन जीवन विस्कळित झाले आहे. अशा परिस्थितीत बंदर परिसरात घडलेल्या या गंभीर घटनेमुळे कामगारांमध्ये भीती आणि नाराजीचे वातावरण निर्माण झाले आहे. कामगारांनी घटनेनंतर आपत्ती व्यवस्थापन आणि तातडीच्या मदत सुविधांच्या उपलब्धतेबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. या घटनेबाबत जेएनपीए प्रशासनातील अधिकारी, तसेच रायगड जिल्हाधिकारी किसन जावळे आणि उरणचे तहसीलदार डॉक्टर उद्धव कदम यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न करण्यात आला. मात्र, त्यांची प्रतिक्रिया प्राप्त होऊ शकली नाही.