रायगड-रत्नागिरीत पावसाचा कहर; चार नद्या धोक्याच्या पातळीवर, शेकडो नागरिकांचे स्थलांतर


रत्नागिरी (प्रतिनिधी): रायगड आणि रत्नागिरी जिल्ह्यांत गेल्या पाच दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. रायगडमधील अंबा, कुंडलिका, सावित्री आणि पाताळगंगा या चारही नद्या धोक्याच्या पातळीवरून वाहत आहेत. कुंडलिका नदीने मध्यरात्रीनंतर रौद्ररूप धारण करत रात्री दीडच्या सुमारास रोहे शहरात पाणी शिरले. अंबा नदीनेही धोक्याची पातळी ओलांडल्याने नदीकाठच्या गावांमध्ये सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.

जिल्ह्यातील सात तालुक्यांमधील पूरग्रस्त आणि दरडग्रस्त भागातील ११ गावांतील वाड्यांमधून एकूण ५६९ नागरिकांना सुरक्षितस्थळी स्थलांतरित करण्यात आले आहे. प्रशासन, महसूल विभाग, पोलीस आणि आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा सतत परिस्थितीवर लक्ष ठेवून आहेत.

दरम्यान, कर्जत तालुक्यातील भगीरथ धबधब्याजवळ मातीची दरड कोसळल्याने तेथे फिरण्यासाठी गेलेल्या एका तरुणाचा दुर्दैवी मृत्यू झाला. तसेच नेरळजवळील धबधब्यात बुडून आणखी एका तरुणाचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. या घटनांमुळे पावसाळी पर्यटनाबाबत प्रशासनाने नागरिकांना विशेष सावधगिरी बाळगण्याचे आवाहन केले आहे.

रत्नागिरी जिल्ह्यातही पावसाची संततधार कायम आहे. खेड तालुक्यातील जगबुडी नदी धोक्याच्या पातळीवरून वाहत असून पुराचे पाणी खेड शहरातील काही भागांत शिरले आहे. धामणंद परिसरातील नारिंगी नदीलाही पूर आल्याने खेड–दापोली मार्ग पाण्याखाली गेला असून या मार्गावरील वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली आहे. नदीकाठची भातशेतीही जलमय झाली आहे. धापोली शहरासह अनेक ठिकाणी पाणी साचल्याने नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे.

हवामान विभागाने पुढील काही दिवसही मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा इशारा दिल्याने प्रशासनाने नदीकाठच्या आणि दरडप्रवण भागातील नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे. तसेच अनावश्यक प्रवास टाळण्यास आणि पर्यटनस्थळांपासून दूर राहण्याचा सल्ला देण्यात आला आहे.