रायगड (प्रतिनिधी): रायगड जिल्ह्यात मुसळधार पावसाने नागरिकांची त्रेधातिरपीट उडविली आहे. अलिबाग तालुक्यात पावसाने हाहाकार उडविला आहे. अलिबाग शहर परिसरात जणू सरोवर तयार झाले होते. अलिबाग शहराचे प्रवेशद्वार असणाऱ्या चेंढरे ग्रामपंचायत हद्दीत असणाऱ्या परिसरात अनेक ठिकाणी पावसाचे पाणी घरांमधून घुसले होते. चेंढरे ग्रामपंचायत हद्दीतील अलिबाग बायपास यंदा देखील पावसाच्या पाण्याखाली गेला होता. या रस्त्यावर साचलेल्या पाण्यामुळे वाहनचालकांना वाहने चालविण्यासाठी कसरत करावी लागली. अलिबाग बायपास परिसर आणि अलिबाग वडखळ मुख्य रस्त्यावर साचलेल्या पाण्यामुळे चेंढरे ग्रामपंचायतीच्या नालेसफाईचा फज्जा उडाला असल्याचे चित्र पाहावयास मिळाले आहे.
चेंढरे ग्रामपंचायतीचे माजी सरपंच निलेश महाडिक यांनी या संदर्भात चेंढरे ग्रामपंचायतीचे ग्रामसेवक आणि रायगड जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी नेहा भोसले यांना अनेकदा बायपासवर साचणारे पाण्याबाबत भ्रमणध्वनीवरून संपर्क करून जाणीव करून दिली होती. परंतु प्रशासकीय यंत्रणांनी या गंभीर बाबीकडे दुर्लक्ष केल्याचे चित्र रविवारी अलिबाग बायपासवर पाहावयास मिळाले.
अलिबाग शहरात येण्यासाठी वडखळ अलिबाग हा मुख्य मार्ग आहे. त्याचबरोबर अलिबागमधून रेवस, रोहा, मुरुड आणि वडखळ, मुंबईकडे जाण्यासाठी बायपास तयार करण्यात आला आहे. या बायपासवर गेले दोन तीन वर्षांपासून पावसाचे पाणी साचून बायपास पाण्याखाली जाण्याचे प्रकार पावसाळ्यात घडत आहेत. याला या परिसरात होणारे शहरीकरणाचे बदल हे प्रमुख कारण समोर असले तरी या परिसरात दरवर्षी कागदावरची नालेसफाई याकडे प्रशासनाचे दुर्लक्ष होताना दिसत आहे.खरेतर या परिसरात असणाऱ्या छोट्या नाल्यांवर काँक्रिटीकर असणाऱ्या मोरया उभारायला हव्यात मात्र तसे होताना दिसत नाही. यामुळे या परिसरात पावसाचा जोर वाढला कि लगेचच बायपास पाण्याखाली जातो.
गेले दोन वर्षे बायपासवर साचणारे पाणी मर्यादित परिसरात साचले जात होते. रविवारी झालेल्या पावसात बायपास पाण्याखाली जाऊन एचपी पेट्रोलपंप आणि रिलायन्स पेट्रोलपंपाच्या प्रवेशद्वारापर्यंत पाणी साचले होते. चेंढरे परिसरातील आनंदनगर मध्ये अनेक ठिकाणी बनगाळ्यांमधून पाणी घुसल्याची चर्चा ऐकावयास मिळाली. चेंढरे ग्रामपंचायतीने पावसाळ्यापूर्वीच्या नियोजनामध्ये नालेसफाईच्या कामांकडे लक्ष केंद्रित करून साचणाऱ्या पाण्याचा निचरा होण्यासाठी प्रयत्न केले तर नागरिकांना पाणी साचण्याची समस्येपासून सुटका मिळू शकते. याबाबत ग्रामपंचायतीच्या ग्रामसेवक आणि जिल्हा परिषदेच्या मुख्यकार्यकारी अधिकारी यांना निलेश महाडिक यांनी वारंवार संपर्क करूनही त्यांनी दुर्लक्ष केले असल्याचा आरोप करण्यात येत आहे.
Home ताज्या बातम्या अलिबाग बायपास गेला पाण्याखाली चेंढरे ग्रामपंचायतीच्या नालेसफाईचा फज्जावारंवार तक्रारी करूनही प्रशासनाचे दुर्लक्ष






