अलिबाग (प्रतिनिधी) : जिल्ह्यात पहिल्याच मुसळधार पावसानंतर अनेक ठिकाणी पाणी साचून पूरस्थिती निर्माण झाल्याच्या पार्श्वभूमीवर माजी आमदार पंडितशेठ पाटील यांनी प्रशासनावर तीव्र टीका केली आहे. पुराचे पाणी वाहून जाणारे नैसर्गिक मार्ग वेळेत मोकळे केले असते, तर आजची परिस्थिती टाळता आली असती, असा दावा त्यांनी केला.
पाटील यांनी सांगितले की, गेल्या अनेक वर्षांपासून त्यांनी जिल्हा प्रशासन आणि जिल्हाधिकाऱ्यांकडे वारंवार पाठपुरावा करून नाले, ओढे आणि पुराच्या पाण्याचा निचरा होणारे मार्ग अतिक्रमणमुक्त करून स्वच्छ करण्याची मागणी केली होती. आपत्ती घडल्यानंतर मदतकार्यावर मोठा खर्च करण्यापेक्षा, आधीच प्रतिबंधात्मक उपाययोजना करून समस्या कायमस्वरूपी सोडवाव्यात, अशी भूमिका त्यांनी सातत्याने मांडली होती.
याशिवाय विविध विकासकामे, मोठमोठे भराव आणि इमारतींना परवानगी देताना पावसाच्या पाण्याचा नैसर्गिक प्रवाह अबाधित राहील का, याची काटेकोर तपासणी करणे आवश्यक असल्याचेही त्यांनी प्रशासनाच्या निदर्शनास आणून दिले होते. मात्र, या सूचनांकडे शासन आणि प्रशासनाने दुर्लक्ष केल्याचा आरोप त्यांनी केला.
पहिल्याच जोरदार पावसात अनेक भागांत रस्ते जलमय झाले, नागरिकांच्या घरांमध्ये पाणी शिरले आणि जनजीवन विस्कळीत झाले. ही परिस्थिती प्रशासनाच्या नियोजनशून्य कारभाराचे द्योतक असल्याचे पाटील यांनी म्हटले आहे.
“वेळीच उपाययोजना केल्या असत्या, तर नागरिकांना हा त्रास सहन करावा लागला नसता. आता निर्माण झालेल्या परिस्थितीला नेमके कोण जबाबदार?” असा सवाल उपस्थित करत त्यांनी प्रशासनाने तातडीने दीर्घकालीन उपाययोजना राबवाव्यात, अशी मागणी केली आहे.





