अलिबाग (प्रतिनिधी) : मुसळधार पावसामुळे दरवर्षी नदीला पूर येऊन मंदिर परिसरासह नाईक आळी, म्हात्रोली, मिळकतखार मळा आणि सारळ परिसरात पाणी शिरण्याच्या घटना घडत होत्या. त्यामुळे नागरिकांना मोठा मनस्ताप सहन करावा लागत होता. मात्र यंदा नदीपात्रातील गाळ काढण्याचे काम झाल्यामुळे पूरस्थितीत लक्षणीय सुधारणा झाल्याचे नागरिकांकडून सांगितले जात आहे.
२०२४-२५ मध्ये झालेल्या अतिवृष्टीदरम्यान नदी ओसंडून वाहिल्याने मंदिर परिसर आणि लगतच्या वस्त्यांमध्ये पाणी घुसले होते. त्यामुळे नागरिकांच्या दैनंदिन जीवनावर परिणाम झाला होता. या पार्श्वभूमीवर नदीपात्रातील साचलेला गाळ काढण्याची मागणी सातत्याने होत होती.
त्यानुसार नदीतील गाळ काढण्याचे काम पूर्ण करण्यात आल्यानंतर यंदाच्या पावसाळ्यात परिस्थितीत मोठा बदल दिसून आला आहे. नदीची वहन क्षमता वाढल्याने पाण्याचा प्रवाह सुरळीत झाला असून पावसाचे पाणी वेगाने निचरा होत आहे. त्यामुळे पूरपाण्याचा धोका मोठ्या प्रमाणात कमी झाल्याचे स्थानिक नागरिकांचे मत आहे.
या कामामुळे नाईक आळी, म्हात्रोली, मिळकतखार मळा आणि सारळ परिसरातील रहिवाशांना मोठा दिलासा मिळाला आहे. पूरस्थितीवर नियंत्रण मिळवण्यासाठी नदीपात्रातील गाळ काढण्याचे काम प्रभावी ठरल्याची भावना नागरिकांनी व्यक्त केली आहे.
दरम्यान, या उपक्रमाबाबत नागरिकांनी जिल्हा परिषद सदस्य तथा प्रतोद अमितदादा नाईक यांच्या पुढाकाराचे कौतुक केले आहे. कोणतीही राजकीय अपेक्षा न ठेवता जनहिताच्या दृष्टीने त्यांनी नदी संवर्धन, पूरनियंत्रण आणि गावाच्या विकासासाठी सातत्याने प्रयत्न केल्याचे स्थानिकांनी सांगितले. मूलभूत सुविधा उपलब्ध करून नागरिकांचे जीवन अधिक सुरक्षित आणि सुखकर करण्यासाठी त्यांनी विविध विकासकामांवर भर दिल्याचेही नागरिकांनी नमूद केले.
मिळकतखार मळा येथील जागरूक नागरिक रंजित रघुनाथ ठोंबरे यांनी या कामाबद्दल समाधान व्यक्त करत, नदी संवर्धन, जलसुरक्षा आणि गावाच्या विकासासाठी अशाच प्रकारचे उपक्रम सातत्याने राबविण्याची अपेक्षा व्यक्त केली आहे.
Home ताज्या बातम्या नदीचा गाळ काढल्याने पूरस्थितीवर नियंत्रण; नाईक आळीसह परिसरातील गावकऱ्यांना मोठा दिलासा





