चिंतामणराव केळकर विद्यालयाचा शिष्यवृत्ती परीक्षेत दैदिप्यमान यश ५ वी व ८ वीच्या परीक्षेत एकूण २० विद्यार्थी शिष्यवृत्तीधारक


अलिबाग(प्रतिनिधी) : महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेमार्फत घेण्यात आलेल्या पूर्व उच्च प्राथमिक (इयत्ता ५ वी) व पूर्व उच्च माध्यमिक (इयत्ता ८ वी) शिष्यवृत्ती परीक्षेत अलिबाग येथील चिंतामणराव केळकर विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी उल्लेखनीय यश संपादन केले आहे. विद्यालयातील एकूण २० विद्यार्थी शिष्यवृत्तीधारक ठरल्याने शाळेच्या शैक्षणिक गुणवत्तेची पुन्हा एकदा प्रचिती आली आहे.
विद्यालयातून पूर्व उच्च प्राथमिक (इयत्ता ५ वी) शिष्यवृत्ती परीक्षेस ९९ विद्यार्थी तर पूर्व उच्च माध्यमिक (इयत्ता ८ वी) शिष्यवृत्ती परीक्षेस ५९ विद्यार्थी प्रविष्ट झाले होते. यापैकी इयत्ता ५ वीच्या परीक्षेत ११ विद्यार्थ्यांनी तर इयत्ता ८ वीच्या परीक्षेत ९ विद्यार्थ्यांनी शिष्यवृत्ती मिळवून घवघवीत यश संपादन केले. अशा प्रकारे दोन्ही परीक्षांमध्ये एकूण २० विद्यार्थी शिष्यवृत्तीधारक ठरले आहेत.
विद्यार्थ्यांच्या या यशामागे त्यांची सातत्यपूर्ण मेहनत, पालकांचे सहकार्य तसेच शिक्षकांचे योग्य मार्गदर्शन आणि नियोजनबद्ध तयारी यांचा मोठा वाटा असल्याचे विद्यालय प्रशासनाने सांगितले. विद्यार्थ्यांनी मिळविलेल्या या यशामुळे विद्यालयाच्या शैक्षणिक परंपरेत आणखी एक मानाचा तुरा रोवला गेला आहे.
या यशस्वी विद्यार्थ्यांचे विद्यालयाच्या वतीने मनःपूर्वक अभिनंदन करण्यात आले. तसेच त्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी शुभेच्छा देण्यात आल्या. विद्यार्थ्यांच्या या यशामुळे पालक, शिक्षक आणि संपूर्ण विद्यालय परिवारात आनंदाचे वातावरण निर्माण झाले असून, आगामी काळातही अशाच गुणवंत विद्यार्थ्यांची परंपरा कायम ठेवण्याचा निर्धार विद्यालयाने व्यक्त केला आहे.