रायगड (प्रतिनिधी) : जिल्ह्यात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे अनेक तालुक्यांत पूरस्थिती निर्माण झाली असून जनजीवन विस्कळीत झाले आहे. अलिबाग, मुरुड, रोहा आणि चौल परिसरात रस्ते पाण्याखाली गेले असून अनेक गावांचा संपर्क तुटला आहे. दरम्यान, गेल्या दोन वर्षांपासून संरक्षक भिंतीची मागणी करूनही प्रशासनाने दुर्लक्ष केल्याचा संताप ग्रामस्थांनी व्यक्त केला आहे.
पावसाळ्यात दरडग्रस्त भागातील नागरिकांना नोटिसा बजावल्या जातात, मात्र कायमस्वरूपी उपाययोजना करण्याकडे प्रशासनाचे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप चिंचोटीचे माजी सदस्य देवायानी पाटील यांनी केला.
अलिबाग शहरात एसटी स्थानक, तळकरनगर, श्रीबाग, बायपास आणि रामनाथ परिसरात पावसाचे पाणी शिरले आहे. नागाव मुख्य रस्ता पाण्याखाली गेला असून कुंट्यांची गोटी गावातही पुराचे पाणी घुसले आहे. मुरुड तालुक्यातील उसरोली व खैरवाडी येथे रस्ते जलमय झाले असून रोहा तालुक्यातील एका फार्महाऊसमध्ये अडकलेल्या पर्यटकांना बाहेर काढण्यासाठी बचावकार्य सुरू आहे.
अलिबाग तालुक्यातील रामराज गावाला पुराचा वेढा बसला आहे. सांबरकुंड आणि बोरघर खोऱ्यातील मुसळधार पावसामुळे नद्या-ओढ्यांना पूर आला असून रामराजला जोडणाऱ्या पुलावरून पाणी वाहत असल्याने वाहतूक बंद करण्यात आली आहे. त्यामुळे ५२ गावांची प्रमुख बाजारपेठ असलेल्या रामराजचा संपर्क तुटला आहे. भिलजी व बोरघर गावांनाही पुराचा धोका निर्माण झाला असून प्रशासनाने नागरिकांना सतर्कतेचा इशारा दिला आहे.
शनिवारी रात्रीपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे चौल परिसर जलमय झाला आहे. अनेक अंतर्गत रस्त्यांवर पाणी साचल्याने वाहतूक विस्कळीत झाली असून शेतीही पाण्याखाली गेली आहे. मोठ्या प्रमाणावर करण्यात आलेल्या भरावांमुळे नैसर्गिक पाण्याचा निचरा अडल्याने वस्त्या, रस्ते आणि शेतांमध्ये पाणी साचत असल्याची तक्रार नागरिकांनी केली आहे. प्रशासनाने नागरिकांना अत्यावश्यक कामाशिवाय घराबाहेर न पडण्याचे आवाहन केले आहे.






