पोयनाड बाजारपेठेत पुराचे पाणी; व्यापाऱ्यांच्या नुकसानीची शिवसेनेने केली पाहणी


अलिबाग (प्रतिनिधी) : सततच्या मुसळधार पावसामुळे पोयनाड बाजारपेठेत पुराचे पाणी शिरल्याने अनेक व्यापाऱ्यांच्या दुकानांमध्ये पाणी घुसून मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. या पार्श्वभूमीवर शिवसेना रायगड जिल्हाप्रमुख राजाभाई केणी यांनी घटनास्थळी भेट देऊन बाधित व्यापाऱ्यांची भेट घेत नुकसानीची प्रत्यक्ष पाहणी केली.
यावेळी युवा सेनेचे निखिल तावडे, पोयनाड व्यापारी असोसिएशनचे अध्यक्ष प्रकाश जैन, व्यापारी राजू अग्रवाल तसेच स्थानिक व्यापारी आणि शिवसैनिक उपस्थित होते. राजाभाई केणी यांनी प्रत्येक दुकानात जाऊन व्यापाऱ्यांच्या अडचणी जाणून घेतल्या. अनेक दुकानांमधील किराणा माल, इलेक्ट्रॉनिक वस्तू, कपडे तसेच इतर साहित्य पाण्यामुळे खराब झाल्याने व्यापाऱ्यांनी मोठ्या आर्थिक नुकसानीची माहिती त्यांना दिली.
पाहणीदरम्यान राजाभाई केणी यांनी संबंधित प्रशासकीय अधिकाऱ्यांशी दूरध्वनीवरून संपर्क साधत तातडीने पंचनामे करण्याच्या, साचलेले पाणी उपसण्याच्या, बाजारपेठेतील साफसफाई त्वरित करण्याच्या तसेच बाधित व्यापाऱ्यांना शासनाकडून योग्य आर्थिक मदत मिळावी यासाठी आवश्यक कार्यवाही करण्याच्या सूचना दिल्या. नागरिकांना आणि व्यापाऱ्यांना कोणत्याही प्रकारचा त्रास होणार नाही याची दक्षता घेण्याचेही त्यांनी प्रशासनाला सांगितले.
यावेळी व्यापाऱ्यांनी बाजारपेठेत दरवर्षी पावसाळ्यात पाणी साचण्याची समस्या कायमस्वरूपी सोडविण्यासाठी प्रभावी निचरा व्यवस्था उभारण्याची मागणी केली. या समस्येवर कायमस्वरूपी उपाययोजना करण्यासाठी शिवसेना व्यापाऱ्यांसोबत ठामपणे उभी राहील आणि शासन व प्रशासनाकडे सातत्याने पाठपुरावा करेल, अशी ग्वाही राजाभाई केणी यांनी दिली.
पुराच्या पाण्यामुळे झालेल्या नुकसानीमुळे व्यापाऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण असून, तातडीने मदत आणि दीर्घकालीन उपाययोजना करण्याची मागणी यावेळी जोर धरू लागली.