पांडवकडा धबधब्यात२तरुण बेपत्ता !


फेसाळणाऱ्या पाण्यात तरुणांसाठी युद्धपातळीवर शोधमोहीम जारी

पनवेल (प्रतिनिधी) : नवी मुंबईच्या खारघर येथील निसर्गरम्य परंतु अत्यंत धोकादायक म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पांडवकडा धबधब्यावर २ वेगवेगळ्या घटनांमध्ये २ तरुण पाण्याच्या तीव्र प्रवाहात वाहून गेल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. सलग दोन दिवसांत घडलेल्या या दुर्घटनांमुळे परिसरात खळबळ उडाली असून, दोन्ही तरुणांचा शोध घेण्यासाठी अग्निशमन दल आणि पोलिसांकडून युद्धपातळीवर शोधमोहीम सुरू करण्यात आली आहे. मात्र अद्याप दोघांचाही शोध लागला नसल्याचे प्राथमिक वृत्त आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, तळोजा येथील रहिवासी मोहम्मद मोबशीर मोहम्मद शाहिद वय २० वर्ष हा तरुण पांडवकडा परिसरात फिरण्यासाठी आला असताना अचानक वाढलेल्या पाण्याच्या तीव्र प्रवाहात वाहून गेला. तर दुसऱ्या घटनेत, मुंबईतील सांताक्रूझ-कलिना परिसरातील रहिवासी शेण्णोन गॅस्पर किनी वय १९ वर्ष हा तरुणही धबधब्याच्या प्रचंड वेगवान पाण्यात वाहून गेला.

घटनेची माहिती मिळताच खारघर पोलीस आणि अग्निशमन दलाचे जवान तातडीने घटनास्थळी दाखल झाले. दोन्ही तरुणांचा शोध घेण्यासाठी परिसरात व्यापक शोधमोहीम सुरू करण्यात आली आहे. मात्र, सततचा पाऊस, धबधब्याचा वाढलेला प्रवाह आणि प्रतिकूल परिस्थितीमुळे शोधकार्यात मोठ्या अडचणी निर्माण होत आहेत.

पावसाळ्यात पांडवकडा धबधबा पर्यटकांसाठी आकर्षणाचे केंद्र असला, तरी अचानक वाढणाऱ्या पाण्याच्या प्रवाहामुळे हा परिसर अत्यंत धोकादायक ठरतो. प्रशासनाने यापूर्वीही पर्यटकांना सावधगिरीचे इशारे दिले असून, काही भागांत प्रवेशावर निर्बंध घालण्यात आले आहेत. तरीदेखील अनेक पर्यटक जीव धोक्यात घालून अशा ठिकाणी जात असल्याने गंभीर दुर्घटना घडत आहेत.