रायगडमध्ये पावसाचा कहर; रस्ते जलमय, नागरिकांना सतर्कतेचे आवाहन


रायगड (प्रतिनिधी): रायगड जिल्ह्यात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले असून अनेक प्रमुख मार्गांवरील वाहतूक ठप्प झाली आहे. रोहा–नागोठणे मार्गावर मोठे झाड रस्त्यावर कोसळल्याने हा मार्ग पूर्णपणे बंद झाला आहे. झाडाची कापणी आणि रस्त्यावर साचलेला मलबा व माती हटविल्यानंतरच हा मार्ग वाहतुकीसाठी खुला होणार असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.

दरम्यान, सततच्या पावसामुळे अनेक सखल भाग जलमय झाले आहेत. पाण्याची पातळी वाढल्याने काही ठिकाणी रस्ते पाण्याखाली गेले असून वाहनांची वाहतूक अशक्य झाली आहे. त्यामुळे पाली–खोपोली मार्गही बंद करण्यात आला आहे. तसेच मुंबई–गोवा राष्ट्रीय महामार्गावरील काही भागात गुढघ्यापेक्षा अधिक पाणी साचल्याने पुलांवरून वाहने नेणे धोकादायक ठरत असून त्या ठिकाणीही वाहतूक तात्पुरती बंद करण्यात आली आहे.

रायगडमधील अंबा, कुंडलिका आणि पाताळगंगा या तीनही प्रमुख नद्या धोक्याच्या पातळीवरून वाहत आहेत. नदीपात्रातील पाणी वाढल्याने नदीकाठच्या गावांमध्ये, शहरांमध्ये आणि वस्त्यांमध्ये पाणी शिरण्याचा धोका निर्माण झाला आहे. या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासनाने नागरिकांना अत्यावश्यक कामाशिवाय घराबाहेर पडू नये, पूल आणि पाण्याखाली गेलेले रस्ते ओलांडण्याचा प्रयत्न करू नये तसेच प्रशासनाच्या सूचनांचे काटेकोर पालन करण्याचे आवाहन केले आहे.