रायगड पोलिसांची धाडसी कामगिरी; पुराच्या पाण्यात अडकलेल्या एसटी बसमधील ८ प्रवाशांची सुखरूप सुटका


रसायनी (प्रतिनिधी): रायगड जिल्ह्यात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे अनेक ठिकाणी पूरसदृश परिस्थिती निर्माण झाली आहे. अशाच संकटाच्या काळात रसायनी पोलिसांनी दाखविलेल्या धाडसामुळे पुराच्या पाण्यात अडकलेल्या एसटी बसमधील आठ प्रवाशांचे प्राण वाचले.
सारसई येथील कर्जत–पेण मार्गावर रस्त्यावर मोठ्या प्रमाणात पाणी साचल्याने एक एसटी बस पुराच्या पाण्यात अडकली होती. बसमधील आठ प्रवासी जीव मुठीत धरून मदतीची वाट पाहत होते. घटनेची माहिती मिळताच रसायनी पोलीस तातडीने घटनास्थळी दाखल झाले. हेल्प फाउंडेशन, रसायनीच्या स्वयंसेवकांच्या सहकार्याने बचावकार्य सुरू करण्यात आले.
बचाव मोहिमेदरम्यान पोलिसांनी अत्यंत धाडसाने आणि तत्परतेने सर्व प्रवाशांना सुरक्षित बाहेर काढले. यामध्ये ७२ वर्षीय ज्येष्ठ महिला चालण्यास असमर्थ असल्याचे लक्षात येताच एका पोलीस कर्मचाऱ्याने त्यांना आपल्या खांद्यावर घेऊन पुराच्या पाण्यातून सुरक्षित स्थळी पोहोचविले. या प्रसंगामुळे पोलिसांची कर्तव्यदक्षता, संवेदनशीलता आणि सेवाभावी वृत्ती पुन्हा एकदा अधोरेखित झाली.
या धाडसी बचावकार्यात सहभागी झालेल्या रसायनी पोलिसांचे आणि हेल्प फाउंडेशनच्या स्वयंसेवकांचे नागरिकांनी कौतुक केले. अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर प्रशासन आणि पोलिसांकडून वेळोवेळी देण्यात येणाऱ्या सूचनांचे काटेकोरपणे पालन करावे, पूरग्रस्त किंवा पाण्याखाली गेलेल्या रस्त्यांवरून प्रवास टाळावा आणि आपत्कालीन परिस्थितीत तातडीने प्रशासनाशी संपर्क साधावा, असे आवाहनही करण्यात आले आहे.