सामाजिक कार्यकर्ते ॲड. राकेश नारायण पाटील यांचा सार्वजनिक बांधकाम विभागावर गंभीर आरोप
अलिबाग(प्रतिनिधी): वेलवली-खानाव मार्गावरील पुलाला पडलेल्या मोठ्या भगदाडामुळे एका निष्पाप शेतकऱ्याचा मृत्यू झाल्यानंतर सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कारभारावर तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. या दुर्घटनेबाबत दोन दिवसांपूर्वीच प्रशासनाला लेखी तक्रार करून संभाव्य अपघाताची सूचना दिली होती. मात्र, संबंधित यंत्रणेने त्याकडे दुर्लक्ष केल्यामुळेच हा दुर्दैवी प्रकार घडल्याचा आरोप सामाजिक कार्यकर्ते ॲड. राकेश नारायण पाटील यांनी केला आहे.
ॲड. पाटील यांनी प्रसिद्धीस दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, पुलावरील भगदाडाची माहिती प्रशासनाला वेळेत देऊनही कोणतीही तातडीची दुरुस्ती किंवा सुरक्षेची उपाययोजना करण्यात आली नाही. सार्वजनिक बांधकाम विभागाच्या निष्काळजी आणि बेजबाबदार कारभारामुळे एका निष्पाप शेतकऱ्याला आपला जीव गमवावा लागला, अशी खंत त्यांनी व्यक्त केली.
दुर्घटनेनंतरही प्रशासनाचा हलगर्जीपणा कायम राहिल्याचा आरोप करत त्यांनी सांगितले की, मयताच्या कुटुंबीयांना आर्थिक मदत जाहीर व्हावी, या मागणीसाठी भर पावसात तब्बल चार तास मृतदेह घटनास्थळी ठेवावा लागला. ही बाब प्रशासनाच्या अपयशाची आणि असंवेदनशीलतेची साक्ष देणारी असल्याचे त्यांनी म्हटले आहे.
या संपूर्ण प्रकरणात स्थानिक ग्रामस्थांनी एकजूट दाखवत आंदोलन केले. तसेच चित्रलेखा पाटील यांनी घेतलेल्या आक्रमक भूमिकेमुळेच प्रशासनाला अखेर नमतं घ्यावे लागले आणि पुढील कार्यवाहीबाबत सकारात्मक भूमिका घ्यावी लागली, असा दावाही ॲड. पाटील यांनी केला.
या दुर्घटनेस जबाबदार असलेल्या सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यकारी अभियंत्यासह संबंधित ठेकेदारावर सदोष मनुष्यवधासह योग्य कायदेशीर कलमांन्वये गुन्हे दाखल करण्यात यावेत, अशी ठाम मागणी ॲड. राकेश नारायण पाटील यांनी केली आहे. तसेच अशा निष्काळजीपणामुळे पुन्हा कोणत्याही निष्पाप नागरिकाचा बळी जाऊ नये, यासाठी दोषींवर कठोर कारवाई करण्याची गरज त्यांनी व्यक्त केली.






