अलिबाग (प्रतिनिधी): निकृष्ट दर्जाच्या कामामुळे वेलवली-खानाव मार्गावरील पुलाला पडलेल्या मोठ्या भगदाडात पडून एका पादचाऱ्याचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना बुधवारी सकाळी घडली. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत असून सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कामकाजावर नागरिकांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे.
मृत व्यक्तीचे नाव चांगू कमळू घरत (रा. वेलवली-खानाव) असे असून ते सकाळच्या वेळी पायी जात असताना पुलावरील भगदाडात पडल्याची प्राथमिक माहिती आहे. पाण्याचा प्रवाह तीव्र असल्याने त्यांचा मृतदेह पुलालगतच्या शेतामध्ये आढळून आला.
स्थानिक नागरिकांच्या म्हणण्यानुसार, पुलाला मोठे भगदाड पडूनही संबंधित प्रशासनाने तेथे कोणतेही इशारा फलक, बॅरिकेड्स किंवा अन्य सुरक्षेच्या उपाययोजना केल्या नव्हत्या. त्यामुळे निष्काळजीपणामुळेच हा जीव गेला, अशी संतप्त प्रतिक्रिया ग्रामस्थांकडून व्यक्त केली जात आहे.
या दुर्घटनेनंतर गावात शोककळा पसरली असून संबंधित बांधकामाच्या दर्जाची चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी नागरिकांनी केली आहे. तसेच संबंधित सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांवर निष्काळजीपणाबद्दल मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात यावा, अशीही मागणी जोर धरत आहे.
दरम्यान, पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला असून मृत्यूचे नेमके कारण आणि घटनेची सखोल चौकशी सुरू आहे. प्रशासनाकडून अधिकृत अहवाल आल्यानंतर पुढील कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती मिळत आहे.






