अलिबाग (प्रतिनिधी): अलिबाग तालुक्यातील किहीम समुद्रकिनारी दुर्मिळ प्रजातीचे ऑलिव्ह रिडले कासव समुद्रातील खवळलेल्या वातावरणामुळे भरकटून किनाऱ्यावर आले होते. या दुर्मिळ सागरी जीवाची माहिती मिळताच स्थानिक ग्रामस्थांनी तत्काळ हालचाल करून कादळवन विभागाशी संपर्क साधला.
घटनेची माहिती मिळाल्यानंतर डॉ. दाभोळकर यांच्याशी संपर्क साधण्यात आला. त्यानंतर कादळवन विभागाचे आरएफओ कांडलवन पाटकर यांनी तातडीने घटनास्थळी येऊन कासवाची पाहणी केली. कासवाला शासकीय वाहनातून पुढील उपचारासाठी शिंदे साहेब यांच्या देखरेखीखाली सुपूर्द करण्यात आले. त्याठिकाणी कासवावर प्राथमिक उपचार करून पुढील आवश्यक वैद्यकीय प्रक्रिया करण्यात येणार आहे.
या संपूर्ण बचाव मोहिमेदरम्यान किहीमचे सरपंच प्रसाद (पिंट्या) गायकवाड आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी घटनास्थळी उपस्थित राहून महत्त्वाची भूमिका बजावली. कासव सुरक्षितपणे कादळवन विभागाच्या ताब्यात जाईपर्यंत त्यांनी समन्वय साधत बचावकार्य यशस्वीरीत्या पूर्ण केले.
समुद्री जैवविविधतेच्या संवर्धनासाठी स्थानिक नागरिक, ग्रामपंचायत आणि कादळवन विभागाने दाखविलेल्या तत्परतेचे सर्व स्तरांतून कौतुक होत आहे. वन्यजीव आढळल्यास त्यांना कोणतीही इजा न करता त्वरित कादळवन विभागाला माहिती देण्याचे आवाहन प्रशासनाने केले आहे.






