म्हात्रोळीतील पाटील आळीत पाणी शिरण्याचा धोका; अमितदादा नाईक यांनी तातडीने नाल्याचा गाळ काढण्याचे काम सुरू केले


अलिबाग (प्रतिनिधी): अलिबाग तालुक्यातील म्हात्रोळी परिसरात सलग तीन ते चार दिवस झालेल्या मुसळधार पावसामुळे पाटील आळीत पाणी शिरण्याची गंभीर परिस्थिती निर्माण झाली होती. नाल्यात मोठ्या प्रमाणात गाळ साचल्याने पावसाचे पाणी वाहून जाण्यास अडथळा निर्माण झाला आणि परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले.
या परिस्थितीची माहिती मिळताच रायगड जिल्हा परिषद सदस्य तथा प्रतोद अमित नाईक यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत परिस्थितीची पाहणी केली. नागरिकांच्या अडचणीची दखल घेत त्यांनी स्वतःची यंत्रसामग्री उपलब्ध करून पाटील आळीलगतच्या नाल्याचा गाळ काढण्याचे काम युद्धपातळीवर सुरू करण्याचे निर्देश दिले. काही तासांतच गाळ उपसण्याचे काम हाती घेण्यात आल्याने पाण्याचा निचरा सुरळीत होण्यास मदत झाली.
स्थानिक नागरिकांनीही या तातडीच्या कार्यवाहीबद्दल समाधान व्यक्त केले. वेळेत उपाययोजना झाल्यामुळे संभाव्य पूरस्थिती टळली असून घरांमध्ये पाणी शिरण्याचा धोका कमी झाल्याचे नागरिकांनी सांगितले.
यावेळी अमितदादा नाईक यांनी संबंधित विभागालाही नाले व गटारांची नियमित स्वच्छता करण्याच्या सूचना देण्याची भूमिका मांडली. पावसाळ्यात अशा समस्या उद्भवू नयेत, यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना राबविणे आवश्यक असल्याचे त्यांनी नमूद केले.
स्थानिकांच्या समस्या तातडीने सोडविणे, प्रशासनाची वाट न पाहता आवश्यक ती यंत्रणा उपलब्ध करून देणे आणि आपत्तीच्या काळात नागरिकांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहणे, हीच लोकप्रतिनिधी म्हणून अमितदादा नाईक यांच्या कार्यशैलीची ओळख असल्याची भावना यावेळी ग्रामस्थांनी व्यक्त केली.