रेवस नाका येथे २४ तासांत नवीन ट्रान्सफॉर्मर बसवून वीजपुरवठा सुरळीत; अमितदादा नाईक यांच्या पाठपुराव्याला यश


अलिबाग (प्रतिनिध): अलिबाग तालुक्यातील रेवस नाका परिसरात २०० केव्ही क्षमतेचा वीज ट्रान्सफॉर्मर अचानक निकामी झाल्याने परिसरातील वीजपुरवठा पूर्णपणे विस्कळीत झाला होता. यामुळे नागरिक, व्यापारी तसेच विविध आस्थापनांना मोठ्या गैरसोयीला सामोरे जावे लागले. या गंभीर परिस्थितीची तात्काळ दखल घेत रायगड जिल्हा परिषद सदस्य तथा प्रतोद अमितदादा नाईक यांनी महावितरण अधिकाऱ्यांशी समन्वय साधत अवघ्या २४ तासांत नवीन ट्रान्सफॉर्मर बसवून वीजपुरवठा पूर्ववत करण्यासाठी प्रभावी पाठपुरावा केला.
वीजपुरवठा खंडित झाल्याची माहिती मिळताच अमितदादा नाईक यांनी महावितरणचे वरिष्ठ अभियंता नमित नाईक तसेच कनिष्ठ अभियंता प्रियांका पैलवान यांच्याशी त्वरित संपर्क साधून परिस्थितीची माहिती दिली. ट्रान्सफॉर्मर बदलण्याच्या कामासाठी आवश्यक असलेला हायड्रा, यंत्रसामग्री आणि इतर तांत्रिक सुविधा तातडीने उपलब्ध करून देण्यासाठी त्यांनी पुढाकार घेतला.
महावितरणच्या अधिकाऱ्यांच्या समन्वयातून युद्धपातळीवर काम सुरू करण्यात आले. आवश्यक तांत्रिक प्रक्रिया पूर्ण करत अवघ्या २४ तासांच्या आत नवीन २०० केव्ही क्षमतेचा ट्रान्सफॉर्मर बसविण्यात आला. त्यानंतर परिसरातील वीजपुरवठा पुन्हा सुरळीत करण्यात आला.
वेळेत झालेल्या या कार्यवाहीमुळे स्थानिक नागरिक, व्यापारी वर्ग, लघुउद्योजक तसेच वीजग्राहकांना मोठा दिलासा मिळाला. दीर्घकाळ वीजपुरवठा खंडित राहण्याची शक्यता टळल्याने परिसरातील जनजीवनही लवकर पूर्वपदावर आले.
यावेळी स्थानिक नागरिक व व्यापारी बांधवांनी अमितदादा नाईक यांच्या तत्पर पाठपुराव्याचे, महावितरण प्रशासनाशी साधलेल्या प्रभावी समन्वयाचे आणि लोकहिताच्या भूमिकेचे कौतुक करत त्यांचे मनःपूर्वक आभार मानले. संकटाच्या काळात तातडीने प्रतिसाद देऊन नागरिकांच्या अडचणी सोडविण्याची त्यांची कार्यपद्धती पुन्हा एकदा अधोरेखित झाल्याची भावना यावेळी व्यक्त करण्यात आली.