अलिबाग (प्रतिनिधी): अलिबाग जिल्हा शासकीय रुग्णालयातील अस्वच्छता, अपुऱ्या सुविधा आणि रुग्णांच्या तक्रारींची दखल घेत नगराध्यक्षा अक्षया नाईक यांनी अचानक पाहणी केली. यावेळी ज्येष्ठ नगरसेवक अनिल चोपडा, अश्विनी ठोसर, आनंद पाटील, सागर भगत, अभिजित माळी, शेकाप तालुकाध्यक्ष सागर पेरेकर व भावेश पेरेकर उपस्थित होते.
पाहणीदरम्यान वॉर्ड, बाथरूम आणि इतर विभागांतील त्रुटींवर नाराजी व्यक्त करत नगराध्यक्षा यांनी प्रशासनाला १५ दिवसांत आवश्यक सुधारणा करण्याचे निर्देश दिले. अन्यथा नागरिकांसह आंदोलनाचा इशाराही दिला.
जिल्हा रुग्णालयातील विभाग पेण किंवा पनवेल येथे स्थलांतरित करण्याच्या चर्चेलाही त्यांनी ठाम विरोध दर्शविला. ग्रामीण भागातील रुग्णांच्या सोयीसाठी कोणताही विभाग बाहेर न हलवता रुग्णालय परिसरातील सुरक्षित इमारतीतच स्थलांतरित करावा, अशी मागणी त्यांनी केली.






