अलिबागच्या पर्यटनाचा ‘वन-डे फॉर्म्युला’ बदलणार?


ओशनॅरियम माध्यमातून पर्यटन वाढीची नवी संकल्पना : अलिबागचे आमदार महेंद्र दळवी यांचा ड्रीम प्रोजेक्ट; प्रशांत नाईक यांनी केली कामाची पाहणी, ६० टक्के काम पूर्ण

अलिबाग(प्रतिनिधी): अलिबागच्या समुद्रकिनाऱ्याचे सौंदर्य आणि मुंबई-पुण्याच्या जवळीकतेमुळे येथे मोठ्या संख्येने पर्यटक येतात; मात्र अनेकांचा अलिबाग दौरा आजही ‘वन-डे ट्रिप’पुरताच मर्यादित राहतो. पर्यटकांचा मुक्काम वाढवून अलिबागच्या पर्यटनाला नवी दिशा देण्याच्या उद्देशाने समुद्रकिनाऱ्यालगत ‘इनोव्हेटिव्ह कंटेनर थीम्ड ओशनॅरियम’ अर्थात वैशिष्ट्यपूर्ण सागरी मत्स्यालय उभारण्यात येत आहे. आमदार महेंद्र दळवी यांचा हा महत्त्वाकांक्षी ड्रीम प्रोजेक्ट असून, या माध्यमातून अलिबागच्या पर्यटन क्षेत्राला नवे आकर्षण मिळण्याची अपेक्षा आहे.

या कामाची पाहणी वीज व बांधकाम समितीचे सभापती प्रशांत नाईक यांनी केली. पाहणीदरम्यान प्रकल्पाच्या कामाची सद्यस्थिती, प्रगती, बांधकामाचा दर्जा आणि पुढील टप्प्यांचे नियोजन याबाबत संबंधित अधिकारी व कंत्राटदार प्रतिनिधींशी चर्चा करण्यात आली.

अलिबाग नगरपरिषद हद्दीतील या महत्त्वाकांक्षी प्रकल्पासाठी विशेष अनुदान योजनेअंतर्गत ६० कोटी रुपयांच्या निधीला २०२४ मध्ये मंजुरी मिळाली आहे. सध्या प्रकल्पाचे सुमारे ६० टक्के काम पूर्ण झाले असून, उर्वरित काम पूर्ण करून मार्च २०२७ पर्यंत ओशनॅरियम सुरू करण्याचे नियोजन आहे.

ओशनॅरियमचा पर्यटकांना समुद्रकिनारा आणि पारंपरिक पर्यटनस्थळांपलीकडे समुद्राशी संबंधित जैवविविधता आणि सागरी जीवनाचा आधुनिक अनुभव एकाच ठिकाणी घेता येणार आहे. त्यामुळे कुटुंबे, विद्यार्थी, पर्यटक तसेच शैक्षणिक सहलींसाठी हे केंद्र आकर्षणाचे ठिकाण ठरण्याची शक्यता आहे.

महत्त्वाचे म्हणजे, अशा आकर्षणामुळे पर्यटकांचा अलिबागमधील मुक्काम वाढल्यास त्याचा थेट फायदा हॉटेल, होमस्टे, रेस्टॉरंट, स्थानिक वाहतूक, पर्यटन मार्गदर्शक आणि स्थानिक छोट्या व्यावसायिकांना होऊ शकतो. त्यामुळे ओशनॅरियम केवळ एक बांधकाम प्रकल्प म्हणून नव्हे, तर अलिबागच्या पर्यटन अर्थव्यवस्थेला चालना देणारा ‘डेस्टिनेशन अँकर’ म्हणून पाहिले जात आहे.

राज्यातील पर्यटनस्थळांमध्ये अलिबागची स्वतंत्र ओळख निर्माण करण्यासाठी आधुनिक आणि अनुभवाधारित पर्यटन सुविधांची गरज आहे. त्या दृष्टीने ओशनॅरियम हा प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर अलिबागच्या पर्यटनाच्या ‘वन-डे फॉर्म्युला’ला मोठा पर्याय निर्माण करणारा आणि राज्याच्या पर्यटन क्षेत्रात वेगळा प्रयोग ठरण्याची अपेक्षा आहे.

पाहणीवेळी नगरसेवक प्रदीप नाईक, नगरअभियंता संतोष मुंढे, स्थापत्य अभियंता ऋतुजा फुटाणे, रचना सहाय्यक सौरभ खरात तसेच कंत्राटदार कंपनी प्रोलिफिक टेक्नोसिस प्रतिनिधी भाविन पारेख आणि अभिजीत उपस्थित होते.

“आमदार महेंद्र दळवी यांनी मंजूर केलेल्या ६० कोटींच्या निधीचा योग्य विनियोग होऊन काम दर्जेदार आणि वेळेत पूर्ण व्हावे, यासाठी आज पाहणी केली. अलिबागकर आणि पर्यटकांसाठी हा वैशिष्ट्यपूर्ण प्रकल्प लवकरात लवकर लोकार्पण करण्याचा आमचा प्रयत्न आहे. हा प्रकल्प अलिबागच्या पर्यटनाला नवी ओळख देईल.”- प्रशांत नाईक, वीज व बांधकाम सभापती, अलिबाग नगरपरिषद

एक्वेरियम आणि ओशनॅरियममध्ये मूलभूत फरक असा आहे की, एक्वेरियम म्हणजे प्रामुख्याने विविध प्रकारचे मासे व जलचर ठेवून त्यांचे दर्शन घडविणारे मत्स्यालय, तर ओशनॅरियमची संकल्पना त्यापेक्षा व्यापक आहे. ओशनॅरियममध्ये समुद्रातील विविध जलचर, सागरी जीवसृष्टी, जैवविविधता आणि सागरी परिसंस्थेचा अनुभव अधिक मोठ्या व आधुनिक स्वरूपात देण्यावर भर असतो. त्यामुळे अलिबागमध्ये प्रस्तावित ‘इनोव्हेटिव्ह कंटेनर थीम्ड ओशनॅरियम’ हे केवळ पारंपरिक मत्स्यालय न राहता सागरी जीवन आणि समुद्राशी संबंधित अनुभव देणारे आधुनिक पर्यटन केंद्र म्हणून विकसित होत आहे.