अलिबागमध्ये मद्यधुंद तरुणांचा धुडगूस; पती-पत्नीस मारहाण
कस्टम ब्रीच कोळीवाडा परिसरातील घटना; आठ जणांविरोधात कारवाईची मागणी
अलिबाग (प्रतिनिधी): अलिबाग शहरातील कस्टम ब्रीच कोळीवाडा परिसरात किरकोळ कारणावरून झालेल्या वादाचे रूपांतर मारहाणीत झाल्याची घटना समोर आली आहे. या प्रकरणात तक्रारदार शोधन रविंद्र पेरेकर आणि त्यांच्या कुटुंबीयांना मारहाण करण्यात आल्याचा आरोप असून, याप्रकरणी अलिबाग पोलीस ठाण्यात लेखी तक्रार देण्यात आली आहे.
तक्रारीनुसार, २६ ऑक्टोबर २०२६ रोजी रात्री सुमारे १२.४५ ते १ वाजण्याच्या दरम्यान शोधन पेरेकर हे आपल्या पत्नीसमवेत गणेश अवघडे यांच्या घरी गेले होते. तेथून परत येत असताना कस्टम ब्रीच कोळीवाडा परिसरात त्यांची मामा प्रशांत उंदिरे यांच्याशी भेट झाली. त्यावेळी परिसरात काही मंडळी रस्त्याच्या कडेला दारू पित बसल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे.
यावेळी रोहन जलसापाडा याने जुन्या वादाचा राग मनात धरून पेरेकर यांना शिवीगाळ व मारहाण करण्यास सुरुवात केल्याचा आरोप आहे. त्यानंतर इतर काही जणांनीही त्यांच्यावर हल्ला केल्याचे तक्रारीत म्हटले आहे. पतीला मारहाण होत असल्याचे पाहून मध्यस्थी करण्यासाठी पुढे आलेल्या त्यांच्या पत्नीवरही मारहाण करण्यात आल्याचा आरोप करण्यात आला आहे.
या घटनेत रोहन जलसापाडा, रितेश म्हटवी आणि अन्य काही व्यक्तींचा सहभाग असल्याचे तक्रारदाराने नमूद केले आहे. संबंधितांनी आपल्याला व पत्नीला हाताबुक्क्यांनी मारहाण केल्याचा आरोप करत शोधन पेरेकर यांनी संबंधितांविरोधात कायदेशीर कारवाई करण्याची मागणी केली आहे.
दरम्यान, या घटनेमुळे परिसरात रात्रीच्या वेळी होणाऱ्या वादविवादांचा आणि कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. तक्रारीतील आरोपांची पोलिसांकडून पडताळणी आणि पुढील कारवाई काय होते, याकडे लक्ष लागले आहे.









