रस्त्यावरील भगदाड ठरले जीवघेणे; अभियंते व ठेकेदाराविरोधात गुन्ह्याची मागणी


अलिबाग (प्रतिनिधी): अलिबाग-रोहा मार्गावरील वेलवली-खानाव परिसरातील रस्त्यावरील मोठ्या भगदाडात पडून शेतकरी चांगू कमळू घरत यांचा मृत्यू झाल्याप्रकरणी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांसह संबंधित ठेकेदाराविरोधात सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी करण्यात आली आहे. याबाबत सामाजिक कार्यकर्ते ॲड. राकेश पाटील यांनी रेवदंडा पोलीस ठाण्यात तक्रार अर्ज दाखल केला आहे.
तक्रारीनुसार, घटनेच्या दोन दिवसांपूर्वीच संबंधित रस्त्यावर मोठे भगदाड असून जीवितहानी होण्याची शक्यता असल्याची लेखी सूचना सार्वजनिक बांधकाम विभागाला देण्यात आली होती. तसेच अलिबागचे तहसीलदार विक्रम पाटील यांनीही रस्ता वाहतुकीसाठी बंद करून इशारा फलक व सुरक्षात्मक उपाययोजना करण्याच्या सूचना दिल्या होत्या. मात्र, या सूचनांकडे दुर्लक्ष करण्यात आल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे.
या निष्काळजीपणामुळेच चांगू घरत यांचा मृत्यू झाल्याचा दावा करत सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता, उपअभियंता, कनिष्ठ अभियंता, संबंधित ठेकेदार तसेच तपासात दोषी आढळणाऱ्यांविरुद्ध भारतीय न्याय संहिता २०२३ मधील कलम १०५ व १०६ अंतर्गत गुन्हा दाखल करण्याची मागणी करण्यात आली आहे. या प्रकरणातील पोलिस तपासाकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे.
**********

रस्त्यावर पडलेल्या भगदाडामुळे जीवितहानी होण्याची शक्यता असल्याची लेखी सूचना आम्ही दोन दिवसांपूर्वीच संबंधित विभागाला दिली होती.

तरीही कोणतीही प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्यात आली नाही. हा केवळ अपघात नसून, गंभीर निष्काळजीपणाचा परिणाम आहे.

सर्वसामान्य नागरिकांच्या जीवापेक्षा ठेकेदारांचे हित जपले जात असेल, तर त्याची जबाबदारी निश्चित झालीच पाहिजे. त्यामुळे संबंधित अधिकारी आणि ठेकेदाराविरोधात सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करुन निष्पक्ष चौकशी करावी.

ॲड. राकेश पाटील, तक्रारदार