अलिबाग समुद्रकिनारी पर्यटकाचा जीव वाचवला; लाईफगार्डच्या तत्परतेमुळे मोठा अनर्थ टळला


अलिबाग (प्रतिनिधी) : अलिबाग येथे पर्यटनासाठी आलेल्या एका ३० वर्षीय पर्यटकाचा समुद्रात बुडताना लाईफगार्डच्या सतर्कतेमुळे थरारक पद्धतीने जीव वाचविण्यात आला. या धाडसी बचावकार्यामुळे मोठा अनर्थ टळला असून, उपस्थित पर्यटकांनी लाईफगार्डच्या कार्याचे कौतुक केले.

मिळालेल्या माहितीनुसार, पुणे जिल्ह्यातील काळेवली फाटा येथील रहिवासी शाहरूख शेख (वय ३०) हे अलिबाग येथे पर्यटनासाठी आले होते. समुद्रात पोहत असताना भरतीच्या पाण्याचा आणि लाटांचा अंदाज न आल्याने ते खोल पाण्यात जाऊन बुडू लागले.

ही बाब किनाऱ्यावर तैनात असलेल्या लाईफगार्डच्या निदर्शनास येताच कुणाल सारंग, प्रथमेश सारंग, निलेश कामतेकर आणि महेश पाटील यांनी क्षणाचाही विलंब न करता समुद्रात धाव घेतली. त्यांनी अथक प्रयत्न करून शाहरूख शेख यांना सुरक्षितपणे किनाऱ्यावर आणले. त्यानंतर त्यांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती मिळाली.

या घटनेमुळे समुद्रात उतरताना सुरक्षिततेच्या नियमांचे पालन करणे, भरती-ओहोटीची माहिती घेणे आणि लाईफगार्डच्या सूचनांचे काटेकोरपणे पालन करणे किती महत्त्वाचे आहे, हे पुन्हा एकदा अधोरेखित झाले आहे. लाईफगार्डच्या तत्परतेमुळे एका पर्यटकाचा जीव वाचला असून त्यांच्या धाडसाचे सर्व स्तरांतून कौतुक होत आहे.