देवकुंड धबधब्यावर बंदीनंतरही पर्यटन सुरू; दोन पर्यटक बेपत्ता, प्रशासनाच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह


रायगड (प्रतिनिधी) : रायगड जिल्ह्यातील माणगाव तालुक्यातील प्रसिद्ध देवकुंड धबधब्यावर शासनाने बंदी लागू केली असतानाही काही स्थानिकांकडून पर्यटकांना आकर्षित करून बेकायदेशीर पर्यटन सुरू असल्याचा गंभीर आरोप होत आहे. या निष्काळजीपणाची मोठी किंमत पुन्हा एकदा मोजावी लागली असून, आज पुणे येथील दोन तरुण धबधब्याच्या परिसरात बेपत्ता झाल्याची घटना घडली आहे. या घटनेमुळे परिसरात चिंता व्यक्त केली जात असून प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर प्रश्न उपस्थित होत आहेत.

देवकुंड धबधबा हा पावसाळ्यात अतिशय धोकादायक ठरत असल्याने यापूर्वी अनेक पर्यटकांचे जीव गेले आहेत. वारंवार होणाऱ्या दुर्घटनांच्या पार्श्वभूमीवर शासनाने या ठिकाणी पर्यटकांच्या प्रवेशावर बंदी घातली आहे. मात्र, असे असतानाही काही जणांकडून सोशल मीडियावर जाहिराती करून पर्यटकांना येथे बोलावले जात असल्याचे सांगितले जात आहे. पर्यटकांसाठी विविध सुविधा उपलब्ध करून देण्याबरोबरच काही ठिकाणी मद्यपुरवठाही होत असल्याचे आरोप आहेत.

विशेष म्हणजे, परिसरात पोलीस बंदोबस्त असतानाही हा प्रकार सुरू असल्याने प्रशासनाच्या अंमलबजावणीवरही प्रश्न उपस्थित होत आहेत. शासनाच्या आदेशांचे उघडपणे उल्लंघन करून सुरू असलेल्या या बेकायदेशीर पर्यटन व्यवसायामुळे निष्पाप पर्यटकांच्या जीवाशी खेळ सुरू असल्याची भावना नागरिक व्यक्त करत आहेत.

एका व्यक्तीचा मृत्यू किंवा बेपत्ता होण्यामागे संपूर्ण कुटुंब उद्ध्वस्त होत असते. त्यामुळे अशा घटना केवळ आकडेवारी म्हणून न पाहता त्यामागील मानवी वेदना लक्षात घेऊन प्रशासनाने कठोर पावले उचलण्याची गरज आहे. शासनाच्या आदेशांचे उल्लंघन करून पर्यटन सुरू ठेवणारे, पर्यटकांच्या सुरक्षेकडे दुर्लक्ष करणारे तसेच नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर तातडीने आणि कठोर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी जोर धरत आहे.

पर्यटकांनीही बंदी असलेल्या किंवा धोकादायक ठिकाणी जाण्याचा मोह टाळावा, प्रशासनाच्या सूचनांचे पालन करावे आणि स्वतःसह इतरांच्या सुरक्षिततेची जबाबदारी घ्यावी, असे आवाहन करण्यात येत आहे. वेळेत कठोर कारवाई झाली नाही, तर अशा दुर्घटना पुन्हा घडण्याची भीती व्यक्त केली जात असून, जनजागृती आणि नियमांची कठोर अंमलबजावणी हीच अशा घटनांवर प्रभावी उपाय ठरू शकते.