आमदार रोहित पवार यांना अस्वस्थ वाटल्याने ब्रिज कँडी रुग्णालयात दाखल; उपचार सुरू


मुंबई (प्रतिनिधी): राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट)चे आमदार रोहित पवार यांना सोमवारी अचानक छातीत दुखणे, मळमळ आणि अंगदुखीचा त्रास जाणवल्याने त्यांना मुंबईतील ब्रिज कँडी रुग्णालय येथे दाखल करण्यात आले आहे.
प्राथमिक माहितीनुसार, प्रकृती अस्वस्थ झाल्यानंतर त्यांना तातडीने रुग्णालयात नेण्यात आले. सध्या तज्ज्ञ डॉक्टरांच्या देखरेखीखाली त्यांच्यावर उपचार सुरू असून आवश्यक वैद्यकीय तपासण्या केल्या जात आहेत. तपासण्यांचे अहवाल आल्यानंतर पुढील उपचारपद्धती निश्चित केली जाणार असल्याचे समजते.
रोहित पवार यांच्या प्रकृतीबाबतची माहिती समोर आल्यानंतर त्यांच्या समर्थकांमध्ये आणि कार्यकर्त्यांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. दरम्यान, डॉक्टर त्यांच्या प्रकृतीवर सातत्याने लक्ष ठेवून असून, उपचारांना ते प्रतिसाद देत असल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे.
रुग्णालयाकडून किंवा त्यांच्या कार्यालयाकडून अधिकृत वैद्यकीय बुलेटिन प्रसिद्ध झाल्यानंतर प्रकृतीबाबत अधिक माहिती स्पष्ट होण्याची अपेक्षा आहे.