
खोपोलीतील गारमाळ परिसरात थरारक अपघात; कार थेट मिसिंग लिंकवर कोसळण्याचा धोका टळला
खोपोली (प्रतिनिधी) : गारमाळ परिसरात निसरड्या रस्त्यावरून स्कोडा कार घसरून सुमारे ५० फूट खोल दरीत कोसळल्याची थरारक घटना घडली. मात्र, कार दरीत एका झाडाला अडकून थांबल्याने मोठी दुर्घटना टळली. झाडामुळे कार आणखी खाली कोसळण्यापासून थांबली आणि चालकाचा जीव अक्षरशः थोडक्यात बचावला. कार झाडाला अडकली नसती, तर ती थेट खाली असलेल्या मिसिंग लिंक मार्गावर कोसळण्याची शक्यता होती, अशी भीती प्रत्यक्षदर्शींनी व्यक्त केली.
मिळालेल्या माहितीनुसार, काही पर्यटक स्कोडा कारमधून गारमाळ परिसरात फिरण्यासाठी आले होते. परिसरातील रस्ता निसरडा असल्याने कार अचानक घसरली. चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने कार रस्त्याच्या कडेला असलेल्या जंगलाच्या दिशेने गेली आणि त्यानंतर थेट दरीत कोसळली.
कार सुमारे ५० फूट खाली गेल्यानंतर एका झाडाला जाऊन अडकली. त्यामुळे कारचा वेग थांबला आणि ती आणखी खोल दरीत कोसळण्यापासून वाचली. अपघाताची माहिती मिळताच परिसरातील नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली. दरीत अडकलेल्या चालकाला स्थानिकांनी प्रयत्नपूर्वक बाहेर काढले. त्यामुळे चालकाचा जीव वाचला.
या घटनेमुळे गारमाळ परिसरातील रस्त्यांच्या सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. परिसरात धोकादायक वळणे, निसरडा रस्ता आणि रस्त्याच्या कडेला असलेली खोल दरी यामुळे वाहनचालकांनी विशेष काळजी घेण्याची गरज आहे. विशेषतः पावसाळ्यात रस्ता निसरडा होत असल्याने पर्यटकांनी वेगावर नियंत्रण ठेवून वाहन चालवावे, असे आवाहन करण्यात येत आहे.
दरम्यान, घटनेची माहिती मिळाल्यानंतर खोपोली पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. अपघात नेमका कशामुळे झाला, याबाबत पुढील तपास सुरू आहे.
बचावली!
झाड ठरले जीवनदायी; ५० फूट दरीत कोसळलेली स्कोडा थेट मिसिंग लिंकवर जाण्यापासून थांबली.




