नवी मुंबई (प्रतिनिधी): नवी मुंबई पोलिसांच्या अमली पदार्थ विरोधी पथकाने तळोजा परिसरात धडक कारवाई करत गांजाची विक्री व पुरवठा करणाऱ्या प्रेमी युगुलाला अटक केली आहे. या कारवाईत २९ ग्रॅम गांजा, चार मोबाईल फोन आणि इतर साहित्य असा एकूण १ लाख २ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. या प्रकरणातील मुख्य आरोपींसह आणखी चार जण फरार असून त्यांचा शोध सुरू आहे.
पोलिसांना मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार तळोजा येथील ओम साई रेसिडेन्सी लॉजवर छापा टाकण्यात आला. या कारवाईत पनवेलमधील वैभव वासुदेव म्हात्रे, वय – २५ आणि चंदीगड येथील करिष्मा प्रेम खडक, वय – २२ यांना ताब्यात घेण्यात आले. तपासादरम्यान दोघेही गेल्या वर्षभरापासून प्रेमसंबंधात असल्याचे निष्पन्न झाले. आरोपींकडून २९ ग्रॅम गांजा, चार मोबाईल फोन आणि इतर साहित्य जप्त करण्यात आले. प्राथमिक चौकशीत अमली पदार्थांच्या पुरवठ्यामागे मोठे रॅकेट कार्यरत असल्याची माहिती समोर आली असून, आरोपींकडून पोलिसांना या साखळीबाबत महत्त्वाचे धागेदोरे मिळाल्याचे सूत्रांनी सांगितले.
या प्रकरणात भरत नेपाळी आणि अमित भोईर हे मुख्य फरार आरोपी असल्याचे पोलिसांनी सांगितले आहे. तसेच अमित भोईरचे आणखी दोन साथीदारही फरार असून त्यांचाही शोध सुरू आहे. सर्व आरोपींविरुद्ध तळोजा पोलीस ठाण्यात एनडीपीएस अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या रॅकेटमध्ये आणखी किती जणांचा सहभाग आहे, अमली पदार्थांचा पुरवठा नेमका कुठून होत होता आणि त्यामागील संपूर्ण नेटवर्क काय आहे, याचा सखोल तपास तळोजा पोलीस करत आहेत.






