मुंबई विद्यापीठाच्या युवा महोत्सवाचा पीएनपीत शुभारंभ


अलिबाग (प्रतिनिधी): विद्यार्थी विकास कक्ष, मुंबई विद्यापीठ आणि प्रभाकर पाटील एज्युकेशन सोसायटीचे कला, वाणिज्य आणि विज्ञान वेश्वी- अलिबाग महाविद्यालयाच्यावतीने युवा महोत्सवाचे आयोजन करण्यात आले. या महोत्सवाचा उद्घाटन समारंभ मंगळवारी (दि.4) महाविद्यालयाच्या संकुलामध्ये मुंबई विद्यापिठाचे सांस्कृतिक कार्यक्रम समन्वयक निलेश सावे, जनता शिक्षण मंडळाचे अध्यक्ष ॲड. गौतम पाटील, अभिनेत्री तथा पीएनपी महाविद्यालयाची माजी विद्यार्थीनी मानसी म्हात्रे, मुंबई विद्यापीठ राष्ट्रीय पातळीवर सुवर्ण पदक विजेता तथा पखवाज वादक पीएनपीचा माजी विद्यार्थी विराज म्हात्रे, कोकण नाट्य परिषदचे सदस्य तथा नाट्य, लेखक आणि दिग्दर्शक किशोर म्हात्रे, पीएनपी कॉलेजचे संचालक विक्रांत वार्डे, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. ओमकार पोटे, प्राचार्य रविंद्र पाटील, जिल्हा समन्वयक प्रा. जयेश म्हात्रे, प्रा. रुपाली पाटील, प्रा. अनिल बांगर, कार्यालयीन समन्वयक गबाजी गीते, प्रा. डॉ. नम्रता पाटील, प्रा. रसिका म्हात्रे, जनसंपर्क अधिकारी अमोल नाईक, हिरेन राठोड, अंकित भानुशाली आदी मान्यवरांसह विद्यार्थी, कलाकार मोठ्या संख्येने उपस्थित होते.

मुंबई विद्यापीठ रायगड (दक्षिण) विभागीय अंतर्गत होणाऱ्या या स्पर्धेत अलिबाग, पेण, महाड, रोहा, तळा, श्रीवर्धन, म्हसळा, पोलादपूर, सुधागड अशा अनेक महाविद्यालयांतून ५०० हून अधिक विद्यार्थ्यांनी संगीत, नाट्य, नृत्य, वकृत्व, वादविवाद, चित्रकला, रांगोळी या स्पर्धांमध्ये सहभाग घेतला आहे.
मुंबई विद्यापीठ सांस्कृतिक कार्यक्रम समन्वयक निलेश सावे यांनी मार्गदर्शन करताना संगितले की मुंबई विद्यापिठाच्या माध्यमातून अलिबाग पीएनपीमध्ये युवा महोत्सव आयोजित करण्यात आला, काही वर्षापुर्वी विद्यार्थी दशेत असलेले विद्यार्थी या युवा महोत्सवाच्या निमित्ताने प्रमुख पाहूणे म्हणून येतात हा खऱ्या अर्थाने महाविद्यालयाचा सन्मान असतो. तो सन्मान जपण्याचे काम अभिनेत्री मानसी म्हात्रे, राष्ट्रीय पातळीवर सुवर्ण पदक मिळविणारे पखवाज वादक विराज म्हात्रे यांनी जपला आहे.

अलिबागध्ये महोत्सवाचा प्रस्ताव मांडल्यावर पीएनपी शिक्षण संस्थेने त्याला तातडीने मान्यता दिली. त्यामुळे या महाविद्यालयाचे संस्था चालक, प्राचार्य यांचे मनापासून आभार व्यक्त करतो, अलिबाग मधून जेएसएम आणि पीएनपी महविद्यालयाच्या विद्यार्थ्यांचा महोत्सवामध्ये हिरहिरीने सहभाग असतो अनेक पारितोषिके त्यांनी पटकावली आहेत, या अलिबागच्या विद्यार्थ्यांनी कलेमध्ये स्वतःचे एक वेगळे स्थान निर्माण केले आहे असे गौरवोद्गार निलेश सावे यांनी काढले. सुट्टीच्या दिवसांत चौलमध्ये लहानपणी सायकलवर फिरण्याचा आनंद लुटला आहे. तेथील रामेश्वराची कृपा आमच्यावर कायमच राहिली आहे, त्यामुळे अलिबागसह या परिसरातील व रायगडचे नाते वेगळे असल्याचे सावे यांनी सांगत जुन्या आठवणींना उजाळा दिला.

जनता शिक्षण मंडळाचे अध्यक्ष ॲड. गौतम पाटील म्हणाले की, मुंबई विद्यापीठाने युवा महोत्सवाचे यजमान पद अलिबागला दिल्याचा आनंद आहे. युवा महोत्सवात परीक्षण करणे सोपे नाही. युवा महोत्सवातून विद्यार्थ्यांना त्यांची कला सादर करण्याची संधी मिळते यातूनच त्यांच्या करिअरचा मार्ग सुरु होतो. आज अनेक विद्यार्थी कला क्षेत्रातून वेगळ्या उंचीवर पोहचले आहेत. ज्या महाविद्यालयात शिक्षण घेतले त्याच महाविद्यालयामध्ये मान्यवर म्हणून विद्यार्थी येतात. त्यावेळी महाविद्यालयाचा खरा सन्मान असतो असे ॲड. गौतम पाटील यांनी सांगितले.
युवा महोत्सवातून करिअरची संधी – मानसी म्हात्रे
पीएनपी एज्युकेशन सोसायटीच्या या शिक्षण संस्थेत तीन वर्षे रमले. युवा महोत्सवाच्या निमित्ताने महाविद्यालयात पुन्हा येण्याची संधी मिळाली. या कार्यक्रमातून हा योग जुळून आला. पीएनपी महाविद्यालयीन जीवनातील बऱ्याच आठवणींना उजाळा मिळाला आहे. पीएनपीने शिक्षणाबरोबरच विद्यार्थ्यांच्या कलेला प्राधान्य दिले. युथ फेस्टीवलच्या माध्यमातून व्यासपीठ मिळाले. यातूनच काहीतरी करण्याचे ध्येय गाठता आले. प्राध्यापकांचे देखील मोलाचे मार्गदर्शन राहिले. त्यामुळे कला क्षेत्रात काम करण्याची संधी प्राप्त झाली, असे सांगत अभिनेत्री मानसी म्हात्रे यांनी कॉलेजच्या जीवनातील आठवणींना उजाळा दिला.यावेळी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. ओमकार पोटे, किशोर म्हात्रे यांनी मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. नम्रता पाटील यांनी तर आभार रसिका म्हात्रे यांनी व्यक्त केले.