साथीच्या रोगांवर नियंत्रणासाठी तातडीच्या उपाययोजना; पेढांबे प्राथमिक आरोग्य केंद्रात आरोग्य समितीची मासिक सभा


अलिबाग  (प्रतिनिधी): शहापूर मतदारसंघातील पेढांबे प्राथमिक आरोग्य केंद्र येथे रायगड जिल्हा परिषद सदस्य तथा प्रतोद मा. श्री. अमितदादा नाईक यांच्या अध्यक्षतेखाली आरोग्य समितीची मासिक सभा उत्साहात पार पडली. पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात साथीच्या रोगांचा वाढता धोका लक्षात घेऊन प्रतिबंधात्मक उपाययोजनांचा आढावा घेण्यात आला. तसेच नागरिकांच्या आरोग्याच्या दृष्टीने विविध महत्त्वाच्या विषयांवर सविस्तर चर्चा करण्यात आली.

सभेत डेंग्यू, मलेरिया, चिकुनगुनिया तसेच इतर साथीच्या आजारांचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी ग्रामपंचायत स्तरावर तातडीने धूर फवारणी (फॉगिंग) आणि आवश्यक त्या ठिकाणी औषध फवारणी करण्याच्या सूचना संबंधित अधिकाऱ्यांना देण्यात आल्या. गावांमध्ये स्वच्छता मोहीम प्रभावीपणे राबविणे, साचलेले पाणी त्वरित हटविणे, जनजागृती वाढविणे आणि आरोग्य विभागाने नियमित सर्वेक्षण करून संशयित रुग्णांवर तातडीने उपचार सुरू करण्यावर भर देण्यात आला.

यावेळी अमितदादा नाईक यांनी नागरिकांच्या आरोग्याला सर्वोच्च प्राधान्य देणे ही सर्व यंत्रणांची सामूहिक जबाबदारी असल्याचे सांगितले. साथीच्या रोगांचा प्रसार रोखण्यासाठी आरोग्य विभाग, ग्रामपंचायती आणि संबंधित सर्व विभागांनी परस्पर समन्वयाने काम करत आवश्यक उपाययोजनांची तातडीने अंमलबजावणी करावी, असे निर्देश त्यांनी दिले.

या बैठकीस आरोग्य समितीचे अधिकारी व कर्मचारी, संबंधित विभागांचे अधिकारी तसेच जिल्हा परिषद सदस्य उपस्थित होते. सभेत विविध आरोग्यविषयक योजनांच्या अंमलबजावणीचाही आढावा घेण्यात आला.