जिल्हा रुग्णालयातील आरोग्य सुविधा अधिक सक्षम; गंभीर शस्त्रक्रियाही आता जिल्ह्यातच – डॉ. निशिकांत पाटील


अलिबाग (प्रतिनिधी) : जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी येणाऱ्या प्रत्येक रुग्णाला दर्जेदार व वेळेवर आरोग्य सुविधा मिळाव्यात, यासाठी सातत्याने प्रयत्न केले जात आहेत, अशी माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. निशिकांत पाटील यांनी दिली.

ते म्हणाले की, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय सुरू झाल्यानंतर जिल्हा रुग्णालयात विविध शाखांतील तज्ज्ञ डॉक्टरांची उपलब्धता वाढली आहे. त्यामुळे पूर्वी मोठ्या शहरांतील रुग्णालयांमध्ये कराव्या लागणाऱ्या अनेक गंभीर आजारांवरील शस्त्रक्रिया आता जिल्हा रुग्णालयातच यशस्वीपणे पार पडत आहेत. याचा थेट लाभ रायगड जिल्ह्यातील सर्वसामान्य रुग्णांना होत असून उपचारासाठी होणारा वेळ, खर्च आणि गैरसोय मोठ्या प्रमाणात कमी झाली आहे.

रुग्णांना आधुनिक वैद्यकीय सुविधा, तज्ज्ञ डॉक्टरांचे मार्गदर्शन तसेच आवश्यक उपचार एकाच ठिकाणी उपलब्ध करून देण्यासाठी प्रशासन सातत्याने प्रयत्नशील असल्याचेही त्यांनी सांगितले. जिल्हा रुग्णालयातील आरोग्य सेवा अधिक सक्षम आणि परिणामकारक करण्यासाठी विविध सुविधा टप्प्याटप्प्याने वाढविण्यात येत असून, भविष्यातही रुग्णकेंद्रित सेवा अधिक बळकट करण्यावर भर दिला जाणार असल्याचे डॉ. पाटील यांनी स्पष्ट केले.