नाशिक (प्रतिनिधी) : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी नाशिक दौऱ्याच्या समारोपाच्या दिवशी पत्रकार परिषद घेत राज्य सरकार, शिक्षण व्यवस्था, कुंभमेळ्याच्या तयारीसह विविध मुद्द्यांवर जोरदार टीका केली. ६ व ७ ऑगस्ट रोजी नाशिकमध्ये पक्षाच्या पदाधिकाऱ्यांसह बैठका घेतल्यानंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधला.
राष्ट्रकुल स्पर्धेतील विजेते खेळाडू श्री. गावित यांची भेट न झाल्याबाबत बोलताना राज ठाकरे म्हणाले, “ते मला भेटण्यासाठी आले होते, याची माहितीच मला देण्यात आली नव्हती. त्यामुळे भेट होऊ शकली नाही. मला माहिती असती तर मी नक्की भेटलो असतो. या प्रकाराबद्दल मी दिलगिरी व्यक्त करतो. ते दिल्लीहून परतल्यानंतर त्यांची निश्चित भेट घेईन.”
कुंभमेळ्याच्या तयारीवर बोलताना त्यांनी २०१५ च्या कुंभमेळ्याचा उल्लेख केला. त्या वेळी कोणतेही अर्थकारण न ठेवता नियोजनबद्ध आणि दर्जेदार कामे झाली होती, असे सांगत त्यांनी सध्याच्या सरकारवर कमिशनखोरीचा आरोप केला. “आज रस्त्यांची चाळण झाली आहे, खड्ड्यांमुळे अपघात होत आहेत, लोकांचे जीव जात आहेत; मात्र सरकारला त्याचे काहीच सोयरसुतक नाही. अनेक कंत्राटदार गुजरातमधील असून वरून जसे आदेश येतील तसेच काम सुरू आहे,” असा आरोप त्यांनी केला.
नाशिकच्या विकासाबाबत त्यांनी नाराजी व्यक्त करत मनसेच्या सत्ताकाळात शहरात उभारलेल्या दर्जेदार रस्त्यांसह बोटॅनिकल गार्डन आणि बाळासाहेब ठाकरे यांच्या नावाने उभारलेल्या स्मारकाचीही दुरवस्था झाल्याचा आरोप केला. “दुसऱ्यांनी केलेले काम टिकवायचे नाही, ही कोणती मानसिकता आहे? झाडांची मोठ्या प्रमाणावर कत्तल झाली, नागरिकांनी आंदोलने केली, तरी प्रशासन शांत राहिले,” असे ते म्हणाले.
दिल्लीतील जंतरमंतरवरील आंदोलनाचा उल्लेख करत त्यांनी सांगितले की, ते आंदोलन केवळ NEET परीक्षेतील घोटाळ्याविरोधात नव्हते, तर देशातील एकूण परिस्थितीबद्दलचा तरुणांचा असंतोष त्यामागे होता. आंदोलकांवर झालेल्या कारवाईनंतर प्रत्येक पालकाला आपल्या मुलालाच मारहाण झाल्याची भावना निर्माण झाली, असे त्यांनी नमूद केले.
शिक्षण व्यवस्थेवर टीका करताना त्यांनी कोचिंग क्लास संस्कृतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. “दहावी झाल्यावर आधी क्लास आणि नंतर कॉलेज अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. विद्यार्थी दिवसाचे आठ-आठ तास क्लासमध्ये बसत असतील तर कॉलेजची भूमिका काय? कॉलेजची फी २० हजार आणि क्लासची फी दीड लाखाच्या घरात, हे नेमके कोणासाठी?” असा सवाल त्यांनी उपस्थित केला. सरकारने क्लासेस आणि महाविद्यालयांच्या भूमिकेबाबत स्पष्ट धोरण जाहीर करावे, अशी मागणीही त्यांनी केली.
NEET परीक्षेतील गोंधळाचा उल्लेख करताना राज ठाकरे म्हणाले की, नाशिकमध्ये अनेक विद्यार्थ्यांनी त्यांना पुन्हा पेपर फुटणार नाही ना, अशी भीती व्यक्त केली. तसेच NEET प्रकरणामुळे नैराश्यातून आत्महत्या केलेल्या यश गोसावी यांच्या आई-वडिलांची भेट घेतल्याचे सांगत त्यांनी राज्य सरकारवर संवेदनाहीनतेचा आरोप केला. “जिल्ह्यातील मुलगा नैराश्यातून आत्महत्या करतो, पण पालकमंत्र्यांना त्याबद्दल सहानुभूतीही वाटत नाही,” अशी टीका त्यांनी केली.
भाजपमधील अंतर्गत राजकारणावर बोलताना त्यांनी, “बाहेरचे शत्रू संपले की पक्षातच शत्रू निर्माण होतात, हा इतिहास आहे. सध्या भाजपमध्येही अंतर्गत सत्तासंघर्ष सुरू आहे,” असे म्हटले.
कोचिंग क्लासेसच्या वाढत्या व्यापारीकरणावर टीका करत त्यांनी NEET पेपरफुटीच्या कथित व्यवहारांचाही उल्लेख केला. “पहिल्यांदा पेपर फुटला तेव्हा त्याची किंमत २५ लाख रुपये असल्याचे ऐकले, आता ती दीड कोटी रुपयांवर गेल्याचे ऐकायला मिळते,” असे ते म्हणाले.
देशातील शिक्षण व्यवस्थेवर शेवटचा प्रश्न उपस्थित करत राज ठाकरे म्हणाले, “आजचे तरुण मोबाईलवरून जग पाहतात आणि आपल्या देशातील परिस्थितीशी तुलना करतात. त्यामुळे त्यांच्यात नैराश्य निर्माण होणे स्वाभाविक आहे. सरकारमधील अनेक मंत्र्यांची मुलं परदेशात शिक्षण घेत आहेत. त्यांचाच जर देशातील शिक्षण व्यवस्थेवर विश्वास नसेल, तर सामान्य नागरिकांनी कोणावर विश्वास ठेवायचा?” असे म्हणत त्यांनी केंद्र आणि राज्य सरकारवर जोरदार निशाणा साधला.
Home ताज्या बातम्या नाशिकमध्ये राज ठाकरे यांचा सरकारवर हल्लाबोल; कुंभमेळा, शिक्षण व्यवस्था, NEET आणि नाशिकच्या...






