नारीशक्ती विधेयकापासून कुंभमेळ्याच्या ठेकेदारीपर्यंत विविध मुद्द्यांवर केंद्र व राज्य सरकारवर टीका
अलिबाग (प्रतिनिधी): पंतप्रधान नरेंद्र मोदी हे संपूर्ण देशाचे नव्हे, तर भाजपच्या एका गटाचे पंतप्रधान असल्याची टीका शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे नेते आणि खासदार संजय राऊत यांनी केली. दिल्लीत पंतप्रधानांकडून काही निवडक नेत्यांसाठी ‘कॅटरिंग’ सुरू असून, केवळ गद्दारांनाच बोलावले जाते, असा आरोपही राऊत यांनी केला.
न्यायालयीन प्रकरणांचा संदर्भ देत राऊत म्हणाले की, काही खासदार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेण्यासाठी गेले होते. त्यावेळी मोदी त्यांना ‘घाबरू नका, मी तुमच्या पाठीशी आहे’, असे सांगत असल्याचा दावा त्यांनी केला. न्यायालयात खटला सुरू असताना अशा प्रकारचे वक्तव्य केले जात असेल, तर त्यातून न्यायालयावर दबाव आणण्याचा प्रयत्न होत असल्याचा अर्थ निघतो, अशी टीका राऊत यांनी केली.
‘नारीशक्ती विधेयकापूर्वी महिलांवरील लाठीचार्जची माफी मागा’
नारीशक्ती विधेयकाच्या मुद्द्यावरही राऊत यांनी केंद्र सरकारवर निशाणा साधला. देश नैतिकतेवर उभा आहे. गद्दार आणि बेईमान लोकांना कोणी विश्वास देतो का, असा सवाल त्यांनी उपस्थित केला. नारीशक्तीचे विधेयक आणण्यापूर्वी जंतर-मंतरवर महिलांवर झालेल्या लाठीचार्जबद्दल सरकारने माफी मागावी, अशी मागणी त्यांनी केली.
अभिजीत दीपके यांच्यावर पाळत ठेवल्याचा आरोप
अभिजीत दीपके यांच्यावर पाळत ठेवली जात असल्याचा आरोप करत राऊत यांनी हा प्रकार ‘रुटीनचे काम’ असल्याचे सांगितले. अशा प्रकारांना हळूहळू अभिजीत दीपके यांनाही सवय होईल. भविष्यात हीच मुले देशाचे नेतृत्व करतील, असेही राऊत म्हणाले.
‘कुंभमेळा धार्मिक न राहता ठेकेदारांचा मेळा’
कुंभमेळ्याच्या आयोजनावरूनही राऊत यांनी सरकारवर गंभीर आरोप केले. कुंभमेळ्याबाबत पहिला आरोप आपणच केला होता, असा दावा करताना सगळी ठेकेदारी गुजरातकडे जाते आणि छोटी-मोठी कामे आपल्या लोकांना दिली जातात, असा आरोप त्यांनी केला.
गिरीश महाजन यांच्या माध्यमातून गुजरातमधील कंपन्यांना तब्बल ५६ हजार कोटी रुपयांची कामे देण्यात आल्याचा आरोपही राऊत यांनी केला. कुंभमेळा आता धार्मिक राहिलेला नसून ठेकेदारांचा मेळा झाल्याची टीका त्यांनी केली. प्रयागराजमधील कुंभमेळा आपण पाहिला असून, महाराष्ट्रातील परिस्थितीही पाहत असल्याचे राऊत म्हणाले.
एकनाथ शिंदेंवरही राऊतांची बोचरी टीका
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर टीका करताना राऊत यांनी त्यांच्या राजकीय भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. सध्या सर्वोच्च न्यायालयात सुनावणी सुरू असल्याने शिंदे अस्वस्थ असल्याचा दावा त्यांनी केला.
मोदी हे शिंदे यांच्या पक्षाचे प्रमुख असल्याचे सांगत राऊत म्हणाले की, शिंदे हे मोदी आणि अमित शाह यांना हिशेब देण्यासाठी जातात. अमित शाह यांच्या संदर्भात टीका करताना राऊत यांनी अत्यंत आक्षेपार्ह आणि बोचरी उपमा वापरून शिंदे यांच्यावर निशाणा साधला.
दरम्यान, संजय राऊत यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्र सरकार, कुंभमेळ्याचे आयोजन तसेच एकनाथ शिंदे यांच्या राजकीय भूमिकेवर केलेल्या या आरोपांमुळे राज्यातील राजकीय वातावरण पुन्हा तापण्याची शक्यता आहे.






