रायगड (प्रतिनिधी): भारतीय रिझर्व्ह बँकेच्या मुख्य कार्यालयातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी रायगड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या अलिबाग येथील मुख्य कार्यालयाला भेट देऊन जिल्हा सहकारी बँकेच्या कामकाजाचा अभ्यास दौरा केला..यावेळी वित्तीय समावेशन, ग्रामीण भागातील बँकिंग सेवांचा विस्तार, सहकारी संस्थांच्या सक्षमीकरणासाठी राबविण्यात आलेले उपक्रम, आधुनिक बँकिंग व्यवस्था तसेच व्यवसायवृद्धीची दखल घेत बँकेच्या कामकाजाचे कौतुक करण्यात आले.
रिझर्व्ह बँकेच्या मुख्य कार्यालयातील डिपार्टमेंट ऑफ रेग्युलशनचे जनरल मॅनेजर विकासकुमार साहू, असिस्टंट जनरल मॅनेजर धनंजय भासे आणि शैलेश इंगळे यांच्या शिष्टमंडळाने बँकेच्या केंद्र कार्यालयाला आणि सहकारी संस्थांना भेट दिली. यावेळी बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी मंदार वर्तक यांनी बँकेच्या वाटचालीचे सविस्तर सादरीकरण केले, याप्रसंगी नाबार्डचे महाराष्ट्र रिजनल ऑफिसचे एजीएम नवल कन्नोर, बँकेचे उपाध्यक्ष सुरेश खैरे हे देखील उपस्थित होते. वित्तीय समावेशनाच्या क्षेत्रात बँकेने केलेल्या कार्याची यावेळी विशेष दखल घेण्यात आली.मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम (CMEGP) आणि प्रधानमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम (PMEGP) यांच्या प्रभावी अंमलबजावणीद्वारे ग्रामीण उद्योजकता, २०,००० पेक्षा अधिक महिला बचतगट, स्वयंरोजगार आणि सूक्ष्म उद्योगांना बँकेने दिलेल्या पाठबळाचे साहू यांनी कौतुक केले. ग्रामीण अर्थव्यवस्थेला बळकटी देण्यासाठी अशा योजनांची प्रभावी अंमलबजावणी महत्त्वाची असल्याचे त्यांनी नमूद केले.
बँकेने केवळ शहरी भागातच नव्हे तर जिल्ह्यातील कशेळे,मजगाव, नाते, विन्हेरे, विळे, राजपुरी, संदेरी अशा ग्रामीण तथा दुर्गम भागांमध्ये शाखा विस्तार करून सर्वसामान्य नागरिकांपर्यंत बँकिंग सेवा पोहोचविण्याच्या आणि ग्रामीण भागातील प्रत्येक घटकाला औपचारिक बँकिंग व्यवस्थेशी जोडण्याचा बँकेचा प्रयत्न हा वित्तीय समावेशनाचा प्रभावी नमुना असल्याचे त्यांनी सांगितले.
यावेळी बोलताना साहू म्हणाले, सहकार क्षेत्रातील बँकांनी व्यवसायवृद्धीबरोबरच वित्तीय समावेशन, संस्थात्मक सक्षमीकरण आणि गुणवत्तापूर्ण बँकिंग सेवांवर सातत्याने भर देणे आवश्यक आहे. बँकेने या दिशेने केलेले प्रयत्न उल्लेखनीय असून बदलत्या बँकिंग व्यवस्थेशी सुसंगतपणे स्वतःमध्ये सातत्याने सुधारणा करण्याचा दृष्टिकोन निश्चितच प्रशंसनीय आहे.
बँकेच्या ₹८,००० कोटींहून अधिक व्यवसायाचा, सातत्यपूर्ण व्यवसायवृद्धीचा, आधुनिक बँकिंग सेवा, डिजिटल परिवर्तन, रिस्क मॅनेजमेंट , सायबर सुरक्षा, ग्राहकाभिमुख सेवा तसेच नियामक अपेक्षांनुसार विकसित करण्यात आलेल्या सक्षम व्यवस्थेचा आढावा घेण्यात आला.
सहकारी संस्थांच्या सक्षमीकरणासाठी बँकेने सातत्याने राबविलेल्या उपक्रमांचा आणि संस्थांचे संगणकीकरण देशात सर्वप्रथम करून त्यांना आधुनिक बँकिंग व्यवस्थेशी जोडण्यासाठी घेतलेल्या पुढाकाराचाही यावेळी विशेष उल्लेख करण्यात आला. या क्षेत्रात बँकेने उभारलेले कार्य सहकार क्षेत्रासाठी मार्गदर्शक ठरू शकते, असे साहू यांनी मत व्यक्त केले.या यशामागे बँकेचे अध्यक्ष जयंत पाटील यांचे विकासाभिमुख नेतृत्व , संचालक मंडळ आणि व्यवस्थापन यांची दूरदृष्टी, अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचे सातत्यपूर्ण प्रयत्न असल्याचेही त्यांनी गौरवाने नमूद केले.
आगामी काळात कृत्रिम बुद्धिमत्ता (AI), डेटा ॲनालिटिक्स, डिजिटल गव्हर्नन्स, अधिक सक्षम सायबर सुरक्षा आणि आधुनिक बँकिंग तंत्रज्ञानाच्या माध्यमातून ग्राहकांना अधिक सुरक्षित, जलद आणि गुणवत्तापूर्ण सेवा देण्याचा बँकेचा निर्धार यावेळी व्यक्त करण्यात आला आणि बँकेने सहकारी संस्थासाठी केलेले कार्य देशातील रोल मॉडेल कार्य ठरेल असे विकासकुमार साहू यांनी आपले मत व्यक्त करीत बँकेचे अभिनंदन केले..






